अंबानगरीत पुन्हा घाण कपात चहा !
By admin | Published: November 13, 2016 12:07 AM2016-11-13T00:07:22+5:302016-11-13T00:07:22+5:30
अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत.
आजाराला आमंत्रण : अतिशय घाण पाण्यात धुतले जातात कप
संदीप मानकर अमरावती
अंबानगरीत पुन्हा लहान कॅन्टीन व हॉटेल्समध्ये चहाचे कप घाण पाण्यात धुतले जात आहेत. त्याच अस्वच्छ कपात ग्राहकांना चहा देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य पुन्हा धोक्यात आले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या दिवसांत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामध्ये दूषित व घाण जागेवरील अन्नपदार्थ प्राशन केल्याने किंवा घाण पाण्यात धुतलेल्या कापातच वारंवार चहा पिल्यानेही पोटाचे व इतर आजार वाढतात.
अंबानगरीत काही हॉटेल्समध्ये अतिक्रमण करुन व हातगाड्यांवरील चहाच्या टपऱ्यांवर अन्नसुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होत आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून या कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे या कायद्याची गरजच काय, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना हॉटेलचालकांवर किंवा अन्नपदार्थांची जर अशाप्रकारे विक्री होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी एफडीएची आहे. परंतु, अन्न व सुरक्षा मानदे कायद्याची अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणीच होत नाही. त्यामुळे वाटेल तशा गलथान सुविधा नागरिकांना पुरविल्या जातात.
अन्नपदार्थांचे दामदुप्पट पैसे घेतल्यानंतरही मात्र त्यांना सुविधा पुरविली जात नाही. अंबानगरीत सात ते १० रुपये कट याप्रमाणे चहाची विक्री करण्यात येते. पण अनेक हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी वारंवार घाण पाणीच वापरले जातात. कप धुतल्यानंतर तासन्तास हे पाणी बदलले जात नाही. ग्र्राहकांच्या डोळ्यासमोर त्याच घाण पाण्यातून हे कप काढली जातात व त्यामध्ये चहा टाकण्यात येतो. मात्र, काही प्रमाणात घाण पाणी त्या चहासोबत आपल्या पोटात जाते. दरदिवसाला अनेक लोकांचे तोंड या कपांना लागते, त्यामुळे कप स्वच्छ पाण्याने धुवून निर्जंतुक करून वापरणे गरजेचे असते. परंतु असे न होता घाण पाण्यातच हे कप धुवून ग्राहकांना या कपांमध्ये चहा दिल्या जातो. अनेक हॉटेल चालकांने कप धुण्याचे पाणी घाण झाल्यानंतर पाणी त्वरित बदलले पाहिजे. एका टबात कप धुतल्यानंतरसुध्दा बाजूला दुसरा टब असला पाहिजे. हॉटेलमध्ये कप धुण्यासाठी स्वतंत्र बेसिन असले पाहिजे. या सर्व बाबी जर नसेल तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून हा सर्व प्रकार तपासला पाहिजे. जर कायद्याचे उल्लंघन होत असेल, तर त्यांना सुधारणा नोटीस दिली पाहिजे. जर वारवांर हा प्रकार घडत असेल तर त्या हॉटेल चालकांचा परवाना रद्द करून त्यांच्या अन्न व सुरक्षा मानदे कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे.