चहा १५ रुपये कट पाण्यातून आजार मोफत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 10:41 PM2017-11-19T22:41:42+5:302017-11-19T22:42:48+5:30
चहा टपरीवर फाइव्ह स्टारचे दर आणि पिण्याच्या पाण्यातून आजार मोफत असा प्रकार येथील शासकीय आयटीआयला लागून असलेल्या इमारतीजवळील चहा कॅन्टिनजवळ उघड झाला आहे.
संदीप मानकर।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चहा टपरीवर फाइव्ह स्टारचे दर आणि पिण्याच्या पाण्यातून आजार मोफत असा प्रकार येथील शासकीय आयटीआयला लागून असलेल्या इमारतीजवळील चहा कॅन्टिनजवळ उघड झाला आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने कॅमेरात कैद केला आहे.
कृष्णा राऊत नामक व्यक्तीने वाहतूक शाखेसमोरील श्रीकृष्णपेठेकडे जाणाºया रस्त्यावर अतिक्रमण करून कॅन्टिन थाटले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर चहाटपरी थाटून व्यवसाय करीत असल्याने या ठिकाणी वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. या कॅन्टिनवर मिळणारा १५ रुपये कट प्रमाणे चहा हा शहरातील सर्वात महागडा चहा असू शकतो. कॉफीचे दर येथे ३० रुपये आहेत. हा दर घणारा कॅन्टिन संचालक पिण्याच्या पाण्याबाबत मात्र पूर्णपणे बेफिकीर आहे. पिण्याच्या पाण्यातून जलजन्य आजार वाटण्याचा जणू त्याने धंदाच थाटला आहे. हा प्रकार खुुलेआम सुरू असताना याकडे अन्न प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
काही दिवसांपूर्वी दहा रुपये कटप्रमाणे चहाची विक्री करण्यात येत होती. चहा चांगला मिळत असल्यामुळे दिवसभर या ठिकाणी ग्राहकांची गर्दी असते. या संधीचा फायदा घेऊन चार दिवसांपूर्वी १५ रुपये कट प्रमाणे चहा विक्री सुरू करण्यात आल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. कॅन्टिनवरील हा चहा म्हणजे सद्यस्थितीत शहरातील सर्वात महागडा चहा म्हणून या कॅन्टिनची ओळख निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांना या दरानुसार चांगली सेवा देण्यात सदर टपरीचालक अपयशी ठरत आहे. अतिशय घाण पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याची नागरिकांना साधी कल्पनाही नसेल. चहा करण्यासाठीसुद्धा या घाण पाण्याचा वापर केला जात असावा. नागरिकांना पिण्यासाठी वापरण्यात येत असलेले पाणी किती अशुद्ध व घाणेरडे आहे, यासंदर्भात रविवारी सदर प्रतिनिधीने पाहणी केली. यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. येथे ठेवण्यात आलेली पाण्याची कॅन उघडली असता, त्यामध्ये तळाशी केसांचा पुंजका आढळून आला. पाण्यात मोठ्या प्रमाणात माती व धूलिकणांचा थर आढळून आला. नळातून पाणी घेण्याच्या सवयीमुळे हा प्रकार नागरिकांच्या पुढे कधीच आला नसेल, मात्र सदर प्रकार कॅमेºयात कैद करण्यात सदर प्रतिनिधीला यश आले. असाच प्रकार रोज या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याकडे आतापर्यंत कुणीही लक्ष दिले नाही.
रस्त्यावरच ही चहाटपरी असल्याने व कॅनचे झाकण अनेकदा उघडेच राहत असल्याने रस्त्यावरील धूलिकण या कॅनमधील पिण्याच्या पाण्यात जातात व येथून नागरिकांच्या पोटात पाणी गेल्यानंतर या पाण्यातून जलजन्य आजारांची मालिका सुरू होते. टायफॉइड, कावीळ, हगवण यासारखे आजारात होतातच तसेच पोटाचे विकारसुद्धा बळावत आहेत. मात्र, बेभाव पैसे घेऊनही नागरिकांना अशा प्रकारचे आजार विकणाºयांना काहीही लोकांच्या जीविताशी घेणेदेणे नसल्याचे निदर्शनास आले आहे. उलट आपणच चांगला चहा विकतो. असा अभिमान बाळगून सदर चहाटपरी संचालकाने व्यवसाय राजरोसपणे थाटला आहे. पण, आपण कशाला मध्ये पडावे, असे म्हणून अनेकदा हा प्रकार चव्हाट्यावर आला नाही. चांगला चहा मिळत असल्याची ओळख सदर टपरीवाल्यांची निर्माण झाल्याने लहान व्यापाºयांपासून तर उच्चविद्याविभूषित या कँटिनवर उभे राहून चहाचा आस्वाद घेतात.
दूषित पाणी पिण्यात आल्याने अनेक प्रकारचे जलजन्य आजार होतात. यामध्ये पोटाचे विकार, डायरिया, कावीळ यांसारख्या आजाराची शक्यता अधिक असते.
- अतुल यादगीरे,
कर्करोग तज्ज्ञ, अमरावती.
मी माझ्या सहकाऱ्याला चांगले पाणी आणण्यास सांगितले होते. पण, कशी धूळ गेली, कळले नाही. पुन्हा असे पाणी वापरले जाणार नाही.
- कृष्णा राऊत
चहाटपरी संचालक