अमरावतीच्या शिरजगाव कसबा येथे शिडी चढून शाळेत जातात शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 09:56 AM2017-12-02T09:56:39+5:302017-12-02T09:59:24+5:30
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांना शिडीने गाठावी लागत आहेत.
मनोहर सुने।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षकांना शिडीने गाठावी लागत आहेत. पावसाळ्यात या शाळेची भिंत पडल्यापासून वर्ग उघड्यावर व गावातील सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत. याकडे प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित होत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.
शिरजगावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ३६७ विद्यार्थी आहेत. २५ आॅगस्ट रोजी पावसामुळे या शाळेची २० फूट उंच संरक्षक भिंत पडली. यानंतर लगेच या ठिकाणी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन संरक्षक भिंत तयार करण्यासाठी पुढकार घेतला. यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. एक महिन्यांपूर्वी संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
मात्र त्यानंतर कंत्राटदार किशोर ठाकरे यांनी रेती मिळत नसल्याचे कारण सांगून बांधकाम बंद ठेवले आहे. याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, शिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता, बीडीओ, तहसीलदार यांना तक्रारी दिलेल्या आहेत.
वर्गांची पर्यायी व्यवस्था
शाळेची ९० फूट लांब व २० फूट उंच भिंत २५ आॅगस्टच्या जोरदार पावसात ढासळली. यावेळी शाळेला सुटी झाल्याने प्राणहानी झाली नाही. मात्र, शाळेत विद्यार्थ्यांना शाळेत कसे जावे, असा प्रश्न निर्माण झाल्याने वर्ग गावातच इतरत्र भरत आहेत. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे, तर शालेय कामाकरिता मुख्याध्यापक व शिक्षकांना शिडी लावून शाळेत जावे लागत आहे.