शिक्षक आमदार निवडणूक (बॉक्स)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:19 AM2020-12-05T04:19:18+5:302020-12-05T04:19:18+5:30
रटाळ प्रक्रिया, ३६ तासांवर वेळ शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया ही ‘एकल संक्रमण’ पद्धतीने असते. ही क्लिष्ट व रटाळ प्रक्रिया ...
रटाळ प्रक्रिया, ३६ तासांवर वेळ
शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची प्रक्रिया ही ‘एकल संक्रमण’ पद्धतीने असते. ही क्लिष्ट व रटाळ प्रक्रिया असल्याची अनेक उमेदवारांची प्रतिक्रिया आहे. गुरुवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेली प्रक्रिया शुक्रवारी रात्री उशिरा किमान ३६ तासांपर्यंत सुरू होती.
-----
एकाच टेबलवर मतमोजणीमुळे विलंब
निवडणुकीत बाद फेरीतील उमेदवारांची मतमोजणीची प्रक्रिया ही एका हॉलमधील एकाच टेबलवर घेण्यात आली. त्यामुळे अन्य उमेदवारांच्या पसंतीच्या मतांची निश्चिती करण्याला वेळ लागला. यामुळेच मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया रेंगाळल्याचे दिसून आले.
----
पंधराव्या फेरीनंतर वाढली कर्मचारी संख्या
मतमोजणीसाठी एका टेबलवर एक मतदान अधिकारी व दोन सहायक अशी व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र, पंधराव्या फेरीनंतर बाद फेरीतल्या उमेदवारांची मतसंख्या जास्त असल्याने मतमोजणीला विलंब लागत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने या टेबलवर सहाय्यासाठी कर्मचारी संख्या वाढविण्यात आली.
------
२० वी फेरीमध्ये सरनाईकांची निर्णायक लिड
मतमोजणीच्या पहिल्या पसंतीच्या २० व्या फेरीमध्ये नीलेश गावंडे या उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची १०४२ मते अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना मिळाली. ही आघाडी त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरली. या फेरीनंतर अन्य उमेदवारांना मात्र मतांसाठी संघर्ष करावा लागल्याने चाहत्यांच्या चेहऱ्यावर ताण दिसून आला.
-----
२२ व्या फेरीत भाजपा उमेदवार बाद
उमेदवार बाद होण्याच्या २२ व्या फेरीत भाजपचे उमेदवार नितीन धांडे हे बाद झाले. त्यांना २५२९ मते मिळाली. एकूण २७ उमेदवारांमध्ये भाजपचे उमेदवार सहाव्या स्थानी राहीले. पहिल्या पसंतीची मते खेचण्यास माघारल्याचे दिसून आले.
-----
मतमोजणी केंद्रावर रात्री शुकशुकाट
गुरुवारी सायंकाळी विजयी मतांचा कोटा निर्धारित झाल्यानंतर बाद फेरी सुरू झाली. रात्री ८ पासून ही फेरी सुरू झाल्यानंतर विजयी मतांचा कोटा मिळविणे अशक्य असल्याने उमेदवारांचे चाहत्यांनी केंद्रातून काढता पाय घेतला असला तरी किरण सरनाईक व शेखर भोयर हे उमेदवार रात्रभर मतमोजणी केंद्रावर उपस्थित होते.
------
भाजपा उमेदवाराच्या दुसऱ्या क्रमांकाची ५९९मते महाआघाडीला २२ व्या बाद फेरीमध्ये भाजपाचे उमेदवार नितीन धांडे यांची दुसऱ्या क्रमांकाची तब्बल ५९९मते महाआघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना मिळाली. याची चर्चा मतमोजणी केंद्रावर होती. शिवाय किरण सरनाईक यांना देखिल दुसऱ्या क्रमांकाची ३३८ मते या फेरीमध्ये मिळाली.
-------
विजय निश्चितीच्या पद्धतीविषयी संभ्रम
विजयासाठी १४९१६ मतांचा कोटा एकाही उमेदवाराला मिळत नसल्याने विजयी उमेदवार निश्चित करण्याच्या पद्धतीविषयी एकवाक्यता नव्हती. शेवटचा उमेदवार विजयी की २६ व्या उमेदवाराची दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात यावी, ती २७ व्या उमेदवाराच्या नावे जमा करण्यात येवून विजयासाठी मतांचा कोटा मिळतो काय, यामुळे केंद्रातील उमेदवारांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम होता.
--------