शिक्षक ‘पोलचिट’ वाटपात, विद्यार्थी वाऱ्यावर
By admin | Published: October 12, 2014 11:29 PM2014-10-12T23:29:35+5:302014-10-12T23:29:35+5:30
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ २ दिवस उरले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रचाराचे घमासान अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रत्येक मतदाराच्या
गजानन मोहोड - अमरावती
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला केवळ २ दिवस उरले आहेत. राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रचाराचे घमासान अंतिम टप्प्यात आहे. शिक्षकदेखील निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रत्येक मतदाराच्या हातात मतदारचिठ्ठी देण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. त्यामुळे शाळेत दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थी वाऱ्यावर असल्याचे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान १५ आॅक्टोबरला होत आहे तत्पूर्वी १४ आौक्टोबरपर्यंत प्रत्येक मतदाराचे हातात मतदारचिठ्ठी पोहचण्याची जबाबदारी मतदान केंद्र प्रमुखावर (बीएलओ) आहे. शिक्षकांसोबत विविध शासकीय यंत्रणातील कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त झाले आहेत. या कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत दोन वेळा प्रशिक्षण वर्ग देखील झाले आहे. काही शिक्षकांना मतदान केंद्र प्रमुख ठेवण्यात आले आहे. निवडणूक विभागाने तयार केलेल्या मतदार चिठ्ठ्या (वोटर स्लिप) मतदारापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी यांच्यावर आहे. निवडणूक यंत्रणेत सहभाग हे राष्ट्रीय कर्तव्याचा भाग असला तरी नियोजनाअभावी शाळेकडे दुर्लक्ष असल्याने विद्यार्थी रामभरोसे आहेत. लहान गावात काही तासांत मतदारचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र मोठ्या शहरांमध्ये हे काम आठ दिवसांपासून सुरू असल्यामुळे विद्यार्थी रामभरोसे आहेत.
शिक्षकांच्याही आहेत व्यथा
मतदारचिठ्ठीचे वाटप करीत असताना मतदारांचे स्थलांतर, भाड्याचे बदललेले घर, पत्त्यात बदल झाला असल्यास त्याची नोंद घ्यावी लागते. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झालेल्या मतदान केंद्रावरील शिक्षकांना नोटीशी बजावण्यात आल्या होत्या. त्यावेळच्या कामाचे मानधन कित्येकांना अद्यापही मिळालेले नाहीत.