शिक्षक बदली वेळापत्रकावर शिक्षक संघाचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:13 AM2021-04-27T04:13:16+5:302021-04-27T04:13:16+5:30
अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे ...
अमरावती : प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक घोषित केले आहे. यामध्ये त्रुटी असल्याचा आक्षेप अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकात जिल्हास्तरावर अवघड व सोपे क्षेत्र घोषित करण्याची २७ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर बदलीस पात्र, बदली अधिकारपात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी २३ एप्रिल ही तारीख निश्चित केली आहे. मात्र, हे संदर्भ शासन धाेरणाशी विसंगत आहेत.
शासननिर्णयानुसार, जोवर अवघड व सोपे क्षेत्र ठरत नाही, तोवर अवघड क्षेत्रातील शाळा कोणती, हे समजू शकणार नाही. ही प्रक्रिया झाल्याशिवाय गटशिक्षणाधिकारी स्तरावर शिक्षकांची यादी तयार होऊ शकणार नाही. याशिवाय संवर्ग-२ करिता पात्र असणाऱ्या शिक्षकांना कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद कार्यकारी अभियंत्यांकडे अर्ज सादर करून प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे निर्देश आहेत. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून, शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करण्यास मर्यादा आल्या असून, शिक्षक संबंधित कार्यालयात पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे सर्व शिक्षकांचे प्रस्ताव गटशिक्षणाधिकारी स्तरावर एकत्रित करून संबंधित अधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करावे, यांसह अन्य मागण्यांची सोडवणूक करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस किरण पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी केली आहे.