नगरपालिका शाळेची कामगिरी ऐकून शिक्षक अवाक्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 01:01 AM2019-08-21T01:01:12+5:302019-08-21T01:02:22+5:30
देशातील सर्वाधिक पटसंख्येची शासकीय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या नगरपालिका शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळेची कामगिरी मांडल्यानंतर अमरावती महापालिकेचे शिक्षक अवाक् झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : देशातील सर्वाधिक पटसंख्येची शासकीय शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराडच्या नगरपालिका शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी शाळेची कामगिरी मांडल्यानंतर अमरावती महापालिकेचे शिक्षक अवाक् झाले. २३९७ पटसंख्येच्या या शाळेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांची आहे.
राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या अमरावती शाखेच्यावतीने मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या उद्बोधनाचे आयोजन सोमवारी अंबापेठ येथील महापालिका शिक्षण विभागाच्या सभागृहात करण्यात आले होते. महापालिका शिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मुख्याध्यापक कोळी म्हणाले, २०११ मध्ये चार शिक्षक आणि २४० पटसंख्या अशी कराड नगरपालिका शाळा क्र. ३ ची अवस्था होती. आताच्या स्थितीत पटसंख्या २३९७ आणि ७२ शिक्षक आहेत. येथील बालवाडीमध्ये ७०० बालके शिक्षण घेतात. पहिलीच्या प्रवेशाकरिता आलेल्या १२०० अर्जांपैकी ४०० प्रवेशानंतर प्रक्रिया थांबविण्यात आली. शाळेच्या परिसरात आधी दारू पिणारे लोक दिसायचे. आता ही राज्यातील एकमेव कॉपोर्रेट शाळा आहे. प्रत्येक वर्ग डिजिटल व वर्गात एसी आहे. राज्यातील पहिले आयएसओ नामांकन प्राप्त या शाळेसाठी मागील पाच वर्षांत लोकसहभागातून ७० लाख रोख जमा झाले. शाळेची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपये आहे. एवढेच नव्हे तर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, अधिकारी, अभियंते, डॉक्टरची मुले आमच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. यासाठी शाळेने विशेष प्रयत्न केले. येथील शिक्षक ‘माझी शाळा’ समजून काम करतात. दररोज मुख्याध्यापक-शिक्षक सुसंवाद होतो. नियमित पालक सभा होते व पालकांना आपलेपणाची वागणूक मिळते. शिक्षक शिकविण्यासाठी अतिरिक्त वेळ देतात. इयत्ता पहिलीचा पाया भक्कम करण्यावर आम्ही भर दिल्याने पुढचा मार्ग सुकर झाला. शाळेच्या यशात महिला शिक्षकांचा अमूल्य वाटा असल्याचेही ते म्हणाले. उपस्थित शिक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या उद्बोधनाचे स्वागत केले. याप्रसंगी अध्यक्ष योगेश पखाले, सतीश मिलांदे, रोशन देशमुख, योगेश चाटे, चेतना बोंडे, मनीषा गावनर, प्रफुल्ल अनिलकर, चेतन आर्विकर, आशीष कोपुळ, नरेश राजगिरी यांनी परिश्रम घेतले.