शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन
By admin | Published: April 17, 2017 12:10 AM2017-04-17T00:10:41+5:302017-04-17T00:10:41+5:30
शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी शिक्षकांनी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
अमरावती : शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शनिवारी शिक्षकांनी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. शासनाने जुनी पेन्शन बंद करून सन २००५ पासून शासकीय सेवेत लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी परिभाषित योजना लागू केली. मात्र ही योजना शिक्षकांसाठी घातक असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी रेटून धरण्यात आली. शासनाकडे पाठपुरावा सातत्याने सुरू आहे. मात्र सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. याचे नेतृत्व शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर, पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, जिल्हाध्यक्ष गौरव काळे आदींनी केले. यावेळी प्रज्वल घोम, अब्दुल राजीक हुसेन, मनोज कडू, नामदेव मेटांगे, योगेश पखाले, राहूल मोहोड, पंकज गुल्हाने, दिलीप कडू उपस्थित होते. या आंदोलनाला अ.भा. प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटनांनी पाठिंबा दिला होता.
नवीन अंशदायी योजना कायद्याशी विसंगत असल्याने ती रद्द झाली पाहिजे, याशिवाय ही योजना सध्या न्यायप्रविष्ठ असल्याने त्याची अंमलबजावणी करणे योग्य नाही. त्यामुळे शासनाने ही योजना बंद करावी, अन्यथा शिक्षकांना येणाऱ्या काळात आंदोलनाची व्याप्ती वाढवावी लागेल.
- शेखर भोयर, अध्यक्ष, शिक्षक महासंघ.