पोषण आहाराच्या जबाबदारीतून शिक्षक मुक्त!
By Admin | Published: January 16, 2016 12:24 AM2016-01-16T00:24:13+5:302016-01-16T00:24:13+5:30
पोषण आहाराच्या माध्यमातून शिक्षक व मुख्याध्यापकांवर येणारे दडपण पुढील सहा महिन्यांत संपविण्यात येणार आहे.
नगरविकास मंत्र्यांचे आश्वासन : सहा महिन्यांत होणार कार्यवाही
धामणगाव रेल्वे : पोषण आहाराच्या माध्यमातून शिक्षक व मुख्याध्यापकांवर येणारे दडपण पुढील सहा महिन्यांत संपविण्यात येणार आहे. इतर विभागांकडे हा कार्यभार देण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली़
तालुक्यातील विविध शिक्षण संस्थांमधील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याशी विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी गुरूवारी ते शहरात आले होते़ आदर्श महाविद्यालय, सेफ़़ला़ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदलाल लोया कन्या विद्यालय, श्रीराम महाविद्यालय, श्रीराम महिला महाविद्यालय येथील सर्व शिक्षक प्राध्यापकांची भेट घेऊन त्यांनी समस्या जाणून घेतल्यात.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात पोषण आहार हा गंभीर विषय निर्माण झाला आहे़ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पोषण आहार मिळत असला तरी थोडे धान्य कमी भरले की शिक्षक व मुख्याध्यापकावर कारवाई होते़ ही कारवाई पुढच्या काळात होऊ नये, यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सोबत दोन वेळा बैठकी पार पडल्या. आता सहा महिन्यांत शिक्षकांना न्याय मिळणार आहे़ वैद्यकीय देयके सादर करताना अनेक अडचणी येतात़ तसेच पाच किंवा दहा टक्के कमिशन घेतल्या शिवाय बिले निघत नाही, ही वस्तुस्थिती आहे़ त्यामुळे संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना क्रॅश कार्ड देण्यात येणार आहेत़ शिक्षक, प्राध्यापक, पदविधरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सक्षम असल्याचे पाटील यांनी सांगितले़ यावेळी भाजप नेते अरूण अडसड, पंचायतसमिती सभापती गणेश राजनकर, उपसभापती अतुल देशमुख, बाजार समितीचे सभापती मोहन इंगळे, नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश टाले बाजार समितीचे संचालक रवी ठाकरे, नंदू ढोले, गटशिक्षणाधिकारी सुनंदा बंड, मुख्याध्यापिका छाया मावळे, छाया गावंडे, यांची उपस्थिती होती़