मेळघाटात शिक्षकांची आठवड्यातून फक्त दोनदा हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:01 PM2017-11-15T12:01:35+5:302017-11-15T12:04:28+5:30
मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही पंचायत समित्यांमधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत हजर राहून शैक्षणिक कार्य करीत आहेत.
पंकज लायदे।
आॅनलाईन लोकमत
अमरावती: मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही पंचायत समित्यांमधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक दांडी मारण्यात पटाईत असून, आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत हजर राहून शैक्षणिक कार्य करीत आहेत.
आदिवासी भागातील शाळांचे शिक्षक कर्तव्यावर येतात किंवा नाही, याची पालकांना कल्पना नसते. शाळा व्यवस्थापन समितीमध्येही हेच आदिवासी बांधव असल्याने ते शाळेत कधी विचारपूस करीत नाही. त्यांच्या अज्ञानाचा फायदा मुख्याध्यापकासह शिक्षकांनी घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम झाल्याने पाचवी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे नावसुद्धा धड लिहिता येत नाही, अशी अवस्था आहे. दर्यापूर, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे येथील काही शिक्षक मेळघाटातील चिखलदरा व धारणी या दोन्ही तालुक्यांमध्ये रुजू झाले असून, शाळा परिसर किंवा मेळघाटात न राहता घरून ये-जा करतात. त्यामुळे शैक्षणिक कार्य खंडित झाले आहे.
शिक्षण विभागाचे अधिकारी मॅनेज
शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर शिक्षक शाळेत गैरहजर आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई न करता प्रकरण मॅनेज केले जाते. हे शिक्षक देणे-घेणे करून प्रकरण दाबून टाकण्यात कमालीचे तरबेज झाले आहेत. त्याचा परिणाम प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर झाला आहे.
पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचा दबाव
शिक्षणाचा खेळखंडोबा होण्यास अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबरच काही पदाधिकारी व लोकप्रतिनिधीही जबाबदार आहेत. आपला कार्यकर्ता आपल्या संबंधातील नातेवाइक असून, त्याला मदत करण्याची भाषा अशा प्रसंगी वापरली जाते, तर कुठे-कुठे हेसुद्धा प्रकरण मॅनेज करून देवाण-घेवाण झाल्याची उदाहरणे पुढे आली आहेत. त्यामुळे शिक्षण विभागावर मरगळ आली असून, आदिवासी मुले शिक्षणापासून दूर होत चालली आहेत.
धारणी पंचायत समितीमधील बऱ्याच शाळांना आकस्मिक भेटी देऊन शिक्षकांचे निलंबन केले आहे. यापुढे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आपल्या बिटमध्ये शैक्षणिक स्तर वाढविण्याबाबत सूचना केल्या जातील व गैरहजर शिक्षकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल.
-उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, पं.स. धारणी.