शिक्षक महासंघाने थाटले रिकाम्या पोत्यांचे दुकान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:15 AM2018-05-04T01:15:53+5:302018-05-04T01:15:53+5:30
शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला.
शिक्षकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याने शिक्षक महासंघाद्वारा हे अफलातून आंदोलन करण्यात आले. मात्र, एकही ग्राहक न फिरकल्याने प्रत्येक तालुक्याच्या ठिकानी शासनाने हा उपक्रम सुरू करावा, अशी उपरोधिक टीका भोयर यांनी केली. रिकाम्या पोत्यासंदर्भात आजपर्यंत शिक्षकांनी आदेश नसल्यामुळे या पोत्यांचा वापर शालेय बांधकामसह इतर प्रयोजनार्थ वापरली. यामधील बहुतांश पोते उंदरांनी कुरतडले. साठवणीसाठी जागा नसल्यानेही या पोत्यांचा मागील सहा वर्षांचा हिशोब देणे अशक्य बाब असल्याचे शेखर भोयर यांनी सांगितले.
शिक्षकांना वेठीस धरण्याचा प्रकार
अध्ययन व अध्यापन हे शिक्षकांचे कार्य आहे. मात्र, शासन वेगवेगळे आदेश काढून शिक्षकांना वेठीस धरत आहे व त्यांच्या मूळ कार्यापासून परावृत्त केले जात आहे.गुणवत्तेचा उदोउदो करणाऱ्या शासनाने गुणवत्तेवरच आघात करणे सुरू केले आहे. हा शिक्षकांच्या दृष्टीने घातक निर्णय असल्याने शासनाने तातडीने हा शासनादेश रद्द करावा, अशी मागणी शेखर भोयर यांनी केली.