शिक्षक मतदारसंघ; निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज, विभागीय आयुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 12:45 PM2020-11-19T12:45:45+5:302020-11-19T12:46:07+5:30
Amravati News विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी ७७ मतदान केंद्रांवर १ डिसेंबरला मतदान होत आहे. या सर्व केंद्रांवर व्हिडीओ रेकाॅर्डिंगसह वेब कास्टिंग होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी ७७ मतदान केंद्रांवर १ डिसेंबरला मतदान होत आहे. या सर्व केंद्रांवर व्हिडीओ रेकाॅर्डिंगसह वेब कास्टिंग होत आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
मराठी वर्णमालेनुसार २७ उमेदवारांच्या नावाची मतपत्रिका आयोगाला पाठविण्यात आली व ती मंजूर झाली आहे. एकूण १९४ पीडब्ल्यूडी मतदारांना पोस्टल बॅलेटसाठी सूचना दिल्या होत्या. त्यापैकी ३० मतदारांनी पत्र दिले. प्रचार कालावधी सुरू झाला आहे. सर्व उमेदवारांची बुधवारी बैठक बोलाविली आहे. प्रचार कालावधीत काय करावे, काय करू नये, याविषयीच्या सूचना उमेदवारांना यावेळी देण्यात येणार असल्याचे सिंह यांनी सांगितले.
मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी ७७ मतदान केंद्रांवर प्रत्येकी तीन याप्रमाणे २३१ व राखीव ३० असे एकूण २६१ मतदान अधिकारी व ८७ मतदान केंद्राध्यक्ष असे एकूण ३४८ मनुष्यबळ राहणार आहे. विलासनगर गोडाऊनमध्ये ३ डिसेंबरला सकाळी ८ पासून मतमोजणीला सुरुवात होईल. दोन हॉलमधील १४ टेबलवर एकूण १८६ अ्धिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याचे सिंह म्हणाले.
मतदाराचे तापमान जास्त असल्यास टोकन
एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहीत मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याला टोकन देण्यात येऊन त्यांना सायंकाळी ४ ते ५ या कालावधीत मतदान करता येणार आहे. एखादा मतदार कोरोना पॉझिटिव्ह असल्यास त्याला तसे पत्र सादर करावे लागेल व त्यानंतर या मतदाराला पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध केली जाईल. येथे पीपीई किटदेखील उपलब्ध राहणार असल्याचे पीयूष सिंह म्हणाले.
प्रतिनिधीला कोरोना चाचणी प्रमाणपत्र आवश्यक
मतदान व मतमोजणीसाठी एका उमेदवाराच्या एकाच प्रतिनिधीची अनुमती आहे. त्याच्यासाठी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविण्यासाठी नऊ प्रकारचे ओळखपत्र पुरावा म्हणूण सादर करता येणार आहे. आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, आमदार, खासदारांचे ओळखपत्र, शिक्षकांचे ओळखपत्र, विद्यापीठ पदवी, पदविका मूळ प्रमाणपत्र व अंपगत्वाचे मूळ प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.