शिक्षक दिन विशेष; पोटाची भूक हाच माझा गुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 07:00 AM2020-09-05T07:00:00+5:302020-09-05T07:00:16+5:30
गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: गुरुजी तुम्ही ज्ञानदाता आहात. तुमचे कर्तृत्वच विद्यार्थ्यांना घडवणार आहे. गरीब विद्यार्थ्यांवरही प्रेम करा. पगारासाठी नव्हे तर माझा प्रत्येक विद्यार्थी घडला पाहिजे यासाठी अध्यापन करा, अशी अपेक्षा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांनी येथे व्यक्त केली.
वांदिले मास्तरांनी मारले, कांबळे गुरुजींनी जीव लावला
चिखलदरा हे कार्यक्षेत्र असलेल्या सिंधुताई सपकाळ सांगतात, वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे या गावातील उत्तर बुनियादी शाळेत मी शिकले. म्हशी पाण्यात बसल्या की, मी शाळेत जायचे. त्यासाठी वांदिले मास्तरने अनेकदा मारले. शद्धलेखनही त्यांच्यामुळेच समजले. नुकत्याच नोकरीवर लागलेल्या कांबळे गुरूजींनी मला जीव लावला. काळजी घेतली.
भाषणातून रेशन मिळते, ते माझ्या मुलांना जेऊ घालते
मी केवळ चौथी शिक लेली. लौकीकार्थाने तशी निरक्षरच. मात्र शिकली, सवरली ते समाजातून. ३५० लेक रांची आई असलेली ‘मी’ वयाच्या २० व्या वर्षी खचले; पण तेवढ्याच ताकदीने उठले. एकाकी लढा दिला. स्मशानात राहिले. कधीकाळी संसारातून उठले. आता ३५० मुले, ४९ सुना, २८२ जावई अशा भल्यामाठ्या संसाराची कुटुंबप्रमुख आहे.
लहानपणी चाफ्याच्या फुलांतून खरकटे अन्न खाल्ले. जळणाऱ्या प्रेताच्या निखाऱ्यावर मी भाकरी भाजली. आज भाषणांतून रेशन मिळते. त्यातून मी माझ्या मुलांना खाऊ घालते. स्वत:च्या मुलांना विसरून विद्यार्थ्यांसाठी झटणारे शिक्षक आजही आहेत.
शिक्षकांमुळेच वाढेल देशाचा लौकीक
चौथीत असताना गुरूजी शाळेत उशिरा येते म्हणून मारायचे. तर मोकाट म्हशी शेतात शिरल्या म्हणून शेतकरी थेट वर्गात शिरायचा. दोन्हीकडून मार. तेव्हाचे शिक्षक झोकून देऊन ज्ञानदान करायचे. आज अपवाद वगळता शिक्षक हा पेशा, व्यवसाय झालाय. मोजक्या का होईना; पण शिक्षकांमुळेच या देशाचा लौकीक वाढेल.
अक्षरे लिहिलेली कागदं चाऊन खायची...
शिक्षकांमुळे वाचनाची गोडी लागली. रस्त्यावरची कागदं उचलून धुऊन ती मी वाचायची. पतीला वाचन पटेचना. उंदरांच्या, मुंगसांच्या बिळात ती कागदं मी लपवायची. एकदा मुंगूसही चावला. पतीने माझ्यासमोर ती फाडू नये यासाठी मी अक्षर लिहिलेली कागदं चावून खायची. नवऱ्यापासून २० व्या वर्षी विभक्त झाले. आयुष्य काळोखमय झाले ;पण निर्धार अन् ज्ञानामुळेच मला जग लख्खपणे दिसू शकले, अन्यथा ज्ञानाशिवाय मी आंधळीच असते..