शिक्षकांनी झाडली जिल्हा परिषद
By admin | Published: June 9, 2016 12:16 AM2016-06-09T00:16:11+5:302016-06-09T00:16:11+5:30
एरवी हाती खडू घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चक्क हातात झाडू घेऊन...
लक्षवेध : बदलीसाठी अभिनव आंदोलन
अमरावती : एरवी हाती खडू घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी चक्क हातात झाडू घेऊन आंतरजिल्हा बदलीसाठी झेडपी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. या अभिनव आंदोलनातून शिक्षकांनी झेडपी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
आंतरजिल्हा बदलीच्या मुद्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने कोणताच तोडगा न काढल्याने ७ जूनपासून गृहजिल्ह्यात बदलीकरीता शेकडो शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता अभियान राबवून शिक्षकांनी शासन, प्रशासनाचे लक्ष वेधले. सन २००८ पासून म्हणजे मागील सहा वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीची मागणी चारशेहून अधिक शिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहेत. परंतु प्रशासनाने कोणतीच भूमिका न घेतल्याने त्यांचे अर्ज तसेच पडून आहेत. वारंवार निवेदन देऊनसुध्दा कोणत्याच हालचाली होत नसल्याने आंतरजिल्हा बदली संघर्ष कृती समितीने आता बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष महेश ठाकरे, विनोद राठोड, स्मिता पानझाडे, नंदकिशोर धर्मे, लिला भेलांडे, मनीषा विंचुरकर, सदाफळे, वंदना गायकवाड, राहुल काळमेघ, मेघा महाजन, ज्ञानेश्र्वर फुंदे, सुरज सोनटक्के, नागसेन रामटेके, अनुप डिके, किरण वानखडे अन्य शिक्षकांचा समावेश आहे.(प्रतिनिधी)