शिक्षकांनी कोरोनाकाळात ऑनलाईन अध्यापनासह सामाजिक उत्तरदायित्व जाेपासले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:16 AM2021-09-05T04:16:45+5:302021-09-05T04:16:45+5:30
(फोटो वापरणे) अमरावती : दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहे. मात्र, अमरावती महापालिका शाळांच्या शिक्षकांनी कोरोनाकाळात ऑनलाईन अध्यापनाचे कर्तव्य ...
(फोटो वापरणे)
अमरावती : दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहे. मात्र, अमरावती महापालिका शाळांच्या शिक्षकांनी कोरोनाकाळात ऑनलाईन अध्यापनाचे कर्तव्य पार पाडले. किंबहुना कोराेना या नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांनी आरोग्य सेवा, सामाजिक उत्तरदायित्त्वाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्या तरी शिक्षकांना मात्र या काळात सतत कामे करावी लागली. शिक्षक वर्ग ऑनलाईन अध्यापनासाठी नवनवीन वाटा शोधण्याच्या प्रयत्नात होते. ते ऑनलाईन अध्यापनाचे कर्तव्य अद्याप बजावत आहेत. याशिवाय माध्यान्ह भोजन आहार योजनांतर्गत मुलांना धान्यवाटपाची जबाबदारीसुद्धा शिक्षकांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या वेळी अतिशय बिकट परिस्थितीत निभावली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आशा वर्करसोबत प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण मोहिमेत शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. काही शिक्षकांनी परिसरात जाऊन मुलांचे गट करून अध्यापनाचे कार्य केले. कोरोना पॉझिटिव्ह आणि गृह विलगीकरणातील रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस, हातावर शिक्का मारणे, बॅनर लावणे अशी कामे डॉक्टर व कर्मचाऱ्यांसमवेत शिक्षकांनी केली आहेत. महापालिकेच्या आपत्कालीन कक्षात सात महिन्यांपासून ९० शिक्षकांनी सेवा दिली आहे. यात होम क्वारंटाईन रुण्गांना मानसिक आधार देण्याचे कर्तव्य बजावले. शहरात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची अँटिजेन टेस्टची कामे शिक्षकांनी केली.
-------------------
शिक्षकांच्या कर्तव्यावर एक नजर
धान्य वाटप
घरोघरी सर्वेक्षण
घरोघरी जाऊन अध्यापन
कोरोना रुग्णांच्या घरी भेटी
कोविड आपत्कालीन कक्ष
तापमान व ऑक्सिजनबाबत दैनंदिन माहिती ठेवणे
होम आयसोलेशनचे फॉर्म भरून घेणे,
हेल्पलाईनच्या माध्यमातून गरजू लोकांना कोरोना स्थितीबद्दल माहिती पुरविणे
कोरोना तपासणी पथकात कर्तव्य
रेल्वे स्टेशन, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी लोकांची तपासणी
-------------------------
शहरातील कोरोना नियंत्रणात राहावा, यासाठी सोपविलेली जबाबदारी शिक्षकांनी पार पाडली. शिक्षकांनी ऑनलाईन तथा ऑफलाईन अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता प्रयत्न केले. सर्व जबाबदाऱ्या पार पाडूनसुद्धा यावर्षी शाळांची पटसंख्या वाढविण्याचे मोलाचे कार्य केले आहे.
- योगेश पखाले, अध्यक्ष, शिक्षक संघ, महापालिका, नगर परिषद