शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:05 PM2018-03-20T22:05:32+5:302018-03-20T22:05:32+5:30

Teachers lose their education order | शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचा खो

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला शिक्षकांचा खो

Next
ठळक मुद्देमेळघाटात शिक्षणाचे तीनतेरा : सकाळच्या शाळेला शिक्षकांची अनुपस्थिती चिंताजनक

आॅनलाईन लोकमत
धारणी : शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांनी १५ मार्चपासून जि.प. शाळा सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्याचे पत्र सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना जारी केले. त्यानुसार प्रस्तुत प्रतिनिधीने सकाळी ७ ते १० पर्यंत विविध शाळांना भेटी दिले असता, बहुतांश शाळेत शिक्षकच नसल्याचा प्रकार उघडकीस आला. यावरून जि.प. शाळेतील शिक्षकांची मनमानी सुरू असल्याचे दिसून येते.
जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी दिलेल्या पत्राची प्रत शिक्षकांच्या मोबाइलवर पोहोचली. मात्र, धारणी पं.स. अंतर्गत काम करणारे बहुतांश शिक्षक शनिवारी गावी जाऊन सोमवारी दुपारपर्यंत परत आले. असे शिक्षक तालुक्यात ५० टक्क््यांपेक्षा अधिक आहेत. अशा शिक्षकांना केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकाकडून वेळेची विशेष सूट दिली जाते. परिणामी रविवारी व सोमवारी शिक्षकांची पटसंख्या कमी असते. मात्र, हजेरी रजिस्टरवर स्वाक्षऱ्या आढळून येतात.
त्यामुळे अनेक शाळा शिक्षकांविना ओस पडल्याचे दिसून आले.
येथे शिक्षक हजर
घुटी येथील शाळेने आश्चर्याचा धक्काच दिला. येथे सर्व शिक्षक ७.५० वाजता हजर दिसले. त्यांनी मॅसेजमध्ये घोळ होत असल्याची तक्रार केली. धाराकोट व आकी शाळेत सर्व शिक्षक वेळेवर पोहोचले होते तसेच तर प्रार्थना होऊन वर्ग सुरू झाले होते.
गटशिक्षणाधिकाऱ्यांचा 'नो रिस्पॉन्स'
या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ४ ते ५ वेळा गटशिक्षणाधिकारी यांच्या मोबाइलवर संपर्क केला. पूर्ण रिंग जाऊनही फोन उचलला गेला नसल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.

आज सकाळी ७ वाजता कुसुमकोट बुजुर्ग येथे शाळेला भेट दिली असता अवघे २-४ विद्यार्थी दिसून आले. मुख्याध्यापिकेसह दोन शिक्षिका आढळून आल्या. इतर शिक्षक बेपत्ता होते. लगेच ७.१० वाजता शिरपूर येथील शाळेला भेट दिली असता दोन शिक्षिका व एक शिक्षक उपस्थित होते. इतर शिक्षक उशिरा येणार असल्याचे सांगण्यात आले.

टिटंबा शाळा उघडलीच नाही
सर्वाधिक विद्यार्थिसंख्या असलेली टिटंबा ही केंद्रशाळा सकाळी ८.१० वाजता बंद होती. दोन-चार विद्यार्थी तेथे फिरत होते, कार्यालयासह संपूर्ण वर्गखोल्यांना कुलूप लागले होते. एकही शिक्षक ८.३० पर्यंत उपस्थित झाले नव्हते. तत्पूर्वी, राणी तंबोली येथील शाळेत ७.३० वाजता विद्यार्थिनी फलकावर सुविचार लिहित होत्या. केवळ १० विद्यार्थी उपस्थित होते, तर एकही शिक्षक शाळेत पोहोचले नव्हते. मांडू येथील शाळेला ७.४० वाजता भेट दिली असता, तीन शिक्षक हजर, तर मुख्याध्यापकासह दोन शिक्षक रजेवर होते.

Web Title: Teachers lose their education order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.