कौंडण्यपूरच्या नदीपात्रात शिक्षकांचे ‘जलसमर्पण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 10:01 PM2017-12-09T22:01:51+5:302017-12-09T22:03:12+5:30
शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाच्यावतीने शनिवारी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो शिक्षकांनी जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुºहा : शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागावे व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक महासंघाच्यावतीने शनिवारी तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर येथे शेकडो शिक्षकांनी जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास जलसमाधी घेणार असल्याचा इशारा यावेळी शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला.
शासनाच्या दररोज नव्या निर्णयामुळे शिक्षणक्षेत्र भरकटत चालले आहे. १९८६ च्या मूळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापासून शिक्षणपद्धती दूर चालली आहे. शासनाच्या धोरणांमुळेच शासकीय शाळांची पटसंख्या रोडावत आहे. स्वयंअर्थसाहाय्यित इंग्रजी शाळांची खिरापत वाटणे, यामध्ये २५ टक्के जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवणे, जि.प. शाळांना पाचवा व आठवा वर्ग जोडणे यामुळेच मराठी शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. याशिवाय सद्यस्थितीत अपत्यसंख्याही कमी आहे. या सर्व बाबीचा सारासार विचार न करता शासन शाळा बंद करायला निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शिक्षक कौंडण्यापुरात दाखल झाले होते व येथील वर्धा नदीपात्रात शिक्षकांनी उतरून जलसमर्पण आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास याच नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
राज्यातील १३१४ मराठी शाळा बंद
शासनाने राज्यातील १ हजार ३१४ मराठी शाळा बंद करण्याचा निश्चय केला आहे. याचा यावेळी शिक्षकांनी निषेध केला. १ हजार ६२८ शाळांना प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान देणे, १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेंशन सुरू करावी, यांसह अनेक मागण्या करण्यात आल्या.