शिक्षकांना वरिष्ठ निवडश्रेणीचा लाभ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 10:57 PM2017-09-03T22:57:04+5:302017-09-03T22:57:34+5:30
शाळांमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून विलंब होत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शाळांमध्ये शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून विलंब होत होता. याला शिक्षण उपसंचालकांनी आवर घातला असून संबंधित कर्मचाºयांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव तत्काळ पाठवावे, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी विभागातील सर्व शिक्षणाधिकाºयांना दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ मिळणार आहे.
अनेक शाळांमध्ये शेकडो शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यापासून वंचित होते. त्यांच्यावरील अन्याय दूर होण्यासाठी मुख्याध्यापक व संस्थाचालकांना याबाबत निर्देश द्यावे, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी दोन दिवसांपूर्वीच शिक्षण उपसंचालक सी.आर.राठोड यांना केली होती. या पत्राची गंभीर दखल घेत शिक्षण उपसंचालकांनी अमरावती विभागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना आदेश दिले आहेत. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांना १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ श्रेणी, तर २४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी लागू होते. यासाठी विभागीय शिक्षण मंडळामार्फत शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले जाते. सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तसा प्रस्ताव प्रथम शिक्षणाधिकारी व नंतर लेखाधिकारी कार्यालयाकडे पाठवावा लागतो. प्रस्ताव मंजूर होऊन आल्यानंतर वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ शिक्षकांना मिळतात. परंतु अनेक शाळांमध्ये अंतर्गत वाद असल्याकारणाने वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही मुख्याध्यापक व संस्थाचालकांकडून सदर प्रस्ताव पाठविला जात नाही. त्यामुळे त्यांना या श्रेणीचा लाभ मिळत नाही. त्यामुळे असे शिक्षक अटी व शर्थी पूर्ण करूनही वरिष्ठ व निवड श्रेणीचा लाभ घेऊ शकत नाही अशा शिक्षकांवर अन्याय होत असल्याची बाबही शेखर भोयर यांनी शिक्षण उपसंचालकांच्या लक्षात आणून दिली. यावर शिक्षण उपसंचालकांनी मुख्याध्यापक व संस्था चालकांना सूचना द्याव्यात, असे आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.