नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 04:26 PM2024-04-04T16:26:32+5:302024-04-04T16:28:10+5:30
नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. बोगस जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावर होता. उच्च न्यायालयानेही राणा यांच्याविरुद्ध निकाल दिला होता
मुंबई/अमरावती - भाजपा नेत्या आणि खासदार नवनीत राणांमुळे यंदा अमरावतीचं राजकीय वातावरणही चांगलंच तापलं आहे. आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणांविरुद्ध उमेदवार देत महायुतीत बंड केलं आहे. त्यामुळे, आता नवनीत राणांची अमरावतीमधील निवडणूक भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. त्यातच, खासदार राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आज अमरावतीमध्ये पहिलीच मोठी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेतला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह स्थानिक भाजपा नेते उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, आणि फडणवीसांनी स्टेजवरुन उपस्थितांना नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरल्याची माहिती दिली.
नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. बोगस जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावर होता. उच्च न्यायालयानेही राणा यांच्याविरुद्ध निकाल दिला होता. त्यामुळेच, आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, इकडे लोकसभेसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, नवनीत राणा यांच्या बाजुने निकाल आला, आणि त्यांच्यासह भाजपा नेत्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नावर नवनीत राणा यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी, त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
''गेल्या अनेक वर्षापासून नवनीत राणा जेलमध्ये जातील, अशा वल्गना विरोधक करत होते. माझी छोटी छोटी मुलंही मला विचारायची, आई तू नेमकं काय केलंय, ज्याच्यामुळे तुला तुरुंगात जावं लागेल. पण सर्वोच्च न्यायालयाने माझ्या संघर्षाला न्याय दिला,'' असे नवनीत राणा यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर म्हटले. यावेळी, मुलांची आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. तर, अमरावतीत खासदार पत्नीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आमदार रवि राणांनी जोरदार भाषण केले. त्यावेळीही, नवनीत राणांना स्टेजवरच रडू कोसळले.
दरम्यान, विरोधकांनी माझ्यावर खालच्या भाषेत टीका केली, महिला म्हणून दाबण्याचा प्रयत्न केला, पण मी संयम सुटू दिला नाही, लोकांना विश्वास दिला. मी खरी आहे, माझ्यावर विश्वास ठेवा, असे लोकांना सांगत राहिले. लोकांनीही माझ्यावर विश्वास ठेवला. अमरावतीकरांनी मला २०१९ ला खासदार केलं. आज मी पुन्हा मैदानात आहे, माझ्या उमेदवारीचा अर्ज भरलाय, असे म्हणत विरोधकांनाही राणा यांनी टोला लगावला.
बच्चू कडूंनी थोपटले दंड
अमरावती लोकसभा मतदारसंघात 'प्रहार'चे उमेदवार दिनेश बूब यांनी नामांकन दाखल केले. यावेळी, आयोजित प्रचार सभेला आमदार बच्चू कडू यांनी संबोधित केले. ''अमरावती लोकसभेची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. समोरील उमेदवार कोट्यधीश आहे. मात्र, सामान्य माणूस जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती ज्वाला होते. त्यामुळे पुढील २० दिवस झोपू नका, विरोधकांची झोप उडवा,'' असे भावनिक आवाहन 'प्रहार जनशक्ती पार्टी'चे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना केले. त्यामुळे, अमरावती मतदारसंघात आमदार कडू यांनी राणांविरुद्ध जोर लावल्याचे दिसून येत आहे.