चिमुकल्या अर्जुनला साश्रू नयनांनी निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:57 PM2018-08-01T22:57:09+5:302018-08-01T22:57:49+5:30
घरासमोरच्या पटांगणात टेलिफोनच्या खांबाच्या अवतीभवती बागडणारा अर्जुन आता यापुढे दिसणार नाही. कारण ज्याच्याबद्दल त्याला भीती दाखवली जायची, नेमके त्याच निर्जीव खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाने त्याचा बळी घेतला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे म्हणत त्याच्या आईसह आप्तांची रडारडी सुरू होती. त्यांच्या आकांताने बुधवारी अंत्यसंस्कार पार पाडत असताना करजगाववासी हेलावले होते.
नीलेश भोकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करजगाव : घरासमोरच्या पटांगणात टेलिफोनच्या खांबाच्या अवतीभवती बागडणारा अर्जुन आता यापुढे दिसणार नाही. कारण ज्याच्याबद्दल त्याला भीती दाखवली जायची, नेमके त्याच निर्जीव खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाने त्याचा बळी घेतला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे म्हणत त्याच्या आईसह आप्तांची रडारडी सुरू होती. त्यांच्या आकांताने बुधवारी अंत्यसंस्कार पार पाडत असताना करजगाववासी हेलावले होते.
अुर्जन विशाल शिरभाते हा सहा वर्षीय चिमुकला मंगळवारी साडेपाचला घरी आला. आल्याबरोबर तो आईला बिलगला. आईने कोडकौतुक केल्यानंतर खेळण्यासाठी तो बाहेर पडला, तो न परतण्यासाठीच. घरापुढील टेलिफोनच्या खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाला त्याचा स्पर्श झाला. या खांबाला हात न लावण्याची ताकिद त्याला आई-वडिलांनी अनेकदा दिली होती. मात्र, आज दिवसच काळाचा होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, हा प्रयत्न निष्फळ ठरला.
बुधवारी सकाळी अर्जुनचा मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. तडकाफडकी शवविच्छेदन झाल्यानंतर ११.३० वाजता अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. एव्हाना ग्रामस्थांना माहिती होताच आबालवृद्ध अर्जुनच्या घरासमोर गोळा झाले. यावेळी त्याचे नातेवाईक आणि आई दीपाली यांचा आकांत हृदय पिळवटून टाकणारा ठरला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे ही माउली प्रत्येकाला विचारत होती. त्याच्या स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले.
एकुलता लेक काळाच्या पडद्याआड
आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ बहीण असे सहा जणांचे शिरभाते कुटुंब. एकुलता एक मुलगा आणि त्यातही हुशार चणीचा असल्याने अर्जुनचे कोडकौतुकच व्हायचे. कुटुंबीयांमध्येही तो प्रिय होता.
शाळेने जागविल्या आठवणी
अर्जुन ज्या शाळेत शिकत होता, त्या संत गाडगेबाबा प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये त्याच्या आठवणी वर्गशिक्षिका मीनल कविटकर यांनी जागविल्या. गृहपाठ वेळच्या वेळी, अभ्यासात नियमित, हुशार आणि चांगली वर्तणूक असल्याने तो वर्गात प्रिय होता, असे त्या म्हणाल्या.
महावितरणच्या चुकीचा फटका
टेलिफोन खांबावरून महावितरणची ओव्हरहेड केबल गेलेली होती. त्याच्या तुटलेल्या आवरणातून तारांचा संपर्क होऊन खांबात वीज प्रवाह येत असल्याच्या तक्रारी वारंवार ग्रामस्थ करीत होते. याच खांबाने अर्जुनचा घात केला. त्याची संतप्त प्रतिक्रिया गावातच असलेल्या विद्युत केंद्राच्या तोडफोडीच्या रूपाने पुढे आली.
महावितरणकडून तक्रार नाही
अर्जुनच्या मृत्यूनंतर स्थानिक विद्युत केंद्राची तोडफोड करण्यात आली होती. याबाबत महावितरणने अद्याप शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे शिरभाते कुटुंबीयांनीही अद्याप महावितरणच्या सदोष कारभाराची तक्रार दिलेली नाही.