अव्वल कारकुनासह तांत्रिक सहायकाला ४० हजारांची लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:11 AM2021-07-01T04:11:30+5:302021-07-01T04:11:30+5:30
अमरावती : स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात होत असलेल्या चौकशीत कुठलीही कारवाई होऊ न देण्याकरिता ...
अमरावती : स्वस्त धान्य दुकानदारांच्या तक्रारीवरून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात होत असलेल्या चौकशीत कुठलीही कारवाई होऊ न देण्याकरिता एका महिला कर्मचाऱ्याला ५० हजारांच्या लाचेची मागणी करून आरोपीने ४० हजार रुपये स्वीकारले. याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुनासह एका कंत्राटी सहायकाला बुधवारी अटक केली. ही कारवाई बियाणी चौकात दुपारी करण्यात आली.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून नारायण जयवंत चव्हाण (२९), कंत्राटी सहायक अविनाश अनंत भगत (२९) असे आरोपीचे नाव आहे. नोकरदार असलेल्या एका २८ वर्षीय महिलेने एसीबीकडे तक्रार नोंदविली होती. फिर्यादी महिला शासकीय कर्मचारी त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याविरुद्ध स्वस्त धान्य दुकानदारांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती येथे होत असलेल्या चौकशीत कोणतीही कारवाई न होऊ देण्याकरिता संबंधित काम पाहणारे अव्वल कारकुनाने ५० हजारांची लाचेची मागणी केली. त्यामुळे ३० जून रोजी पंचासमक्ष एसीबीने याची पडताळणी केली. आरोपीने ४० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून रक्कम ही अविनाश भगत यांना फोन करून त्यांचेकडे देण्यास महिलेला सांगितले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अरुण सावंत, अधीक्षक, गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल तसरे व त्यांच्या पथकाने केली आहे.