आयटीआय प्रवेशामध्ये यंदाही तांत्रिक अडचण
By admin | Published: June 26, 2017 12:10 AM2017-06-26T00:10:59+5:302017-06-26T00:10:59+5:30
पारदर्शकतेसाठी शासनाच्या सर्वच खात्यांमध्ये आॅनलाईन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात असला तरी....
सर्व्हर डाऊन : जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पारदर्शकतेसाठी शासनाच्या सर्वच खात्यांमध्ये आॅनलाईन तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात असला तरी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात आयटीआय प्रवेशाच्या आॅनलाईन प्रक्रियेत सालाबादप्रमाणे यंदाही तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थी संताप व्यक्त करीत आहे. गत तीन वर्षांपासून आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्या तरी यंदाही व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने मागचाच कित्ता गिरवत सर्व्हरच्या क्षमतेत सुधारणा न केल्याने हजारो विद्यार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका सहन करावा लागत आहे.
दहावीनंतर सरासरी मार्क मिळालेले विद्यार्थी पॉलिटेक्निकऐवजी आयटीआयचे तांत्रिक शिक्षण घेण्यास पसंती देतात. दहावी, बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची झुंबड उडत असते. पारंपारिक पद्धतीने अर्ज खरेदी संबंधित शैक्षणिक संस्थेत दाखल करणे, प्रवेश फी जमा करणे अशी कामे विद्यार्थ्यांना आयटीआयच्या संस्थेत प्रवेश प्रक्रिया करावी लागत होती. यासाठी उभे राहावे लागत असे. हा मन:स्ताप कमी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहीती व वापर वाढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपूर्वी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र पहिल्याच वर्षी प्रवेश प्रक्रियेचा बोजबारा उडाला होता.
तीन वर्षापूर्वी आयटीआयची प्रवेश प्रक्रिया इंजिनिअर, मेडीकल, फॉर्मसीच्या धर्तीवर आॅनलाईन करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळे पहिल्या दोन वर्षाचा अनुभव लक्षात घेता सर्व्हर डाऊन असणे, हँग होणे, संकेतस्थळ न उघडणे यासह अनेक समस्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश अडचणी आल्या होत्या. अगदी प्रवेश यादी देखील वेळेवर जाहीर होऊ शकली नव्हती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश न घेता आल्याची तक्रार होती. यंदाही तोच कित्ता गिरवला जात असल्याचा अनुभव येत आहे.
सायबर कॅफेत विद्यार्थ्यांची गर्दी अन् मनस्ताप
मागील तीन वर्षांपासून प्रवेश आॅनलाईन पद्धतीने होत असले तरी अनेकदा अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. नेटवर्कची क्षमता कमी आणि वापरणारे युजर अधिक असल्यामुळे आयटीआय प्रवेशाचे ‘तीनतेरा’ वाजले आहेत. प्रवेश प्रक्रिया सुलभ होण्याऐवजी ‘तांत्रिक’ अडचणीची ठरत आहे. यंदाच्या वर्षासाठी १९ जूनपासून आयटीआयची आॅनलाईन फॉर्म भरताना संकेत स्थळात काही तांत्रिक कारणामुळे वेबसाईटमध्येच हँग होत आहे त्यामुळे सायबर कॅफेवर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.
दोन दिवसांपासून अर्ज सादर करण्यासाठी सायबर कॅफेत चकरा मारत आहे. बुधवारी दुपारी संकेतस्थळ सुरू झाले. काही वेळानंतर पुन्हा बिझी मोडमध्ये गेल्याने अर्ज सादर करता आला नाही.
- मनीष उके, विद्यार्थी