यूजीसी नेट ऑनलाइन परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण; एकतास उशिरा सुरू झाली परीक्षा
By उज्वल भालेकर | Published: December 13, 2023 08:35 PM2023-12-13T20:35:18+5:302023-12-13T20:35:58+5:30
बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.
अमरावती : यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) ऑनलाइन परीक्षा ६ डिसेंबरपासून सुरू आहेत. बुधवारी या दुसऱ्या शिफ़्ट दरम्यान आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक तास परीक्षा सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. बाहेरील जिल्ह्यातून तसेच ग्रामीण भागातून परिक्षेसाठी आलेल्या परिक्षार्थींच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडल्याने यावेळी चांगलाच मनस्ताप व्यक्त करण्यात आला.
सहायक प्राध्यापक तसेच ज्युनिअर फेलोशिप आणि सहायक प्राध्यापकांसाठी यूजीसी-राष्ट्रीय पात्रता चाचणी (यूजीसी-नेट) परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात. त्यानुसार ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ही ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. एनटीए’च्या वेळापत्रकानुसार दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या ऑनलाइन परीक्षेदरम्यान परीक्षार्थींना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. १२ डिसेंबरला परीक्षा सुरू झाल्यानंतर दीडतासाने अचानक तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा बंद पडली होती. तर बुधवारी दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही दुपारी ३ वाजता सुरू होणे अपेक्षित होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा ४ वाजता सुरू झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या अर्धातासपूर्वीच प्रवेश बंद केला होता. पाच मिनिट उशीर झाला तरीही परीक्षार्थींना प्रवेश नाकारला जातो. त्यामुळेसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोडवर असलेल्या पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा केंद्रावर इतर जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील परीक्षार्थी हे एक तासापूर्वीच केंद्रावर पोहचले होते. परंतु परीक्षा उशीरा एक तास उशिरा सुरू झाल्याने ६ वाजता सुटणारी परीक्षा सायंकाळी ७ वाजता आटोपल्याने अनेक परीक्षार्थीच्या परतीच्या प्रवेशाचे नियोजन बिघडल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
सर्वच केंद्रावर अडचण
तांत्रिक अडचणीमुळे देशभरातील सर्वच केंद्रावरील परीक्षा थांबल्या आहेत. परीक्षा सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पीसी पॉईंट प्लॅनेट प्लाझा परीक्षा केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्यानंतर आयटी मॅनेजर विशाल काळे यांनी दिली.
परीक्षा केंद्रावर पाच मिनिटं उशीर झाला तरी विद्यार्थांना प्रवेश नाकारला जातो. तर एक तास उशिरा परीक्षा सुरू झाली याला कोण जबाबदार आहे. उशिरा परीक्षा सुरू झाल्याने अनेक बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचे नियोजन बिघडले आहे. त्यांना आता गावी परतण्यासाठी आवश्यक बस मिळेल की नाही याची चिंता आहे.
सुबोध धुरंदर, परीक्षार्थी