‘माइंड लॉजिक ’च्या तंत्रज्ञांची झाडाझडती
By Admin | Published: May 13, 2017 12:07 AM2017-05-13T00:07:46+5:302017-05-13T00:07:46+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी जबाबदारी सोपविलेल्या ....
कुलगुरुंनी फटकारले : प्रकरण आॅनलाईन परीक्षा निकाल लांबणीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी जबाबदारी सोपविलेल्या बंगळूरु येथील माइंड लॉजिक ही एजन्सी कुचकामी ठरल्याप्रकरणी कुलगुरुंनी या कंपनीच्या तंत्रज्ञांची शुक्रवारी झाडाझडती घेतली. येत्या सत्रातील परीक्षांचा निकाल वेळेपूर्वी लावल्याबाबत कानउघाडणी केल्याची माहिती आहे.
कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीला कुलसचिव अजय देशमुख, परीक्षा मंडळाचे संचालक जयंत वडते, लेखा व वित्त अधिकारी शशीकांत आस्वले, माइंड लॉजिक कंपनीचे संचालक जीतेन, तंत्रज्ञ श्रीजीत आदी उपस्थित होते. प्रारंभी कुलगुरु चांदेकर यांनी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागल्याप्रकरणी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आॅनलाईन निकाल वेळेपूर्वी लागणे अपेक्षित असताना केवळ माइंड लॉजिकच्या गलथान कारभारामुळे विद्यापीठावर नामुष्की ओढवल्याची बाब कुलगुरुं नी बैठकीत व्यक्त केली. विद्यापीठाने प्रायोगिक तत्त्वावर अभियांत्रिकी, फार्मसी व विधी अभ्यासक्रमांचे निकाल आॅनलाईन लावण्याचे ठरविले. मात्र एजन्सीच्या नाकर्तेपणामुळे ते शक्य झाले नाही, याविषयावर चिंतन करण्यात आले. करारानुसार एजन्सीने वेळेपूर्वीच निकाल लावणे अनिवार्य असताना ते पूर्ण केले नाही, ही बाब विद्यापीठ कायद्याला छेद देणारी ठरली. त्यामुळे कंपनीकडे विद्यार्थ्यांचा असलेला डेटा अगोदर सुरक्षितपणे विद्यापीठाला परत करावा, असे या बैठकीत निश्चित झाले. उन्हाळी परीक्षांचे निकाल ४५ दिवसांच्या आत लावण्यात माइंड लॉजिक एजन्सी आता कुचकामी ठरली तर गंभीर स्वरुपाची कारवाई केली जाईल, अशी ताकीदही दिली.
विधी अभ्यासक्रमाचा ‘क्रॉईम’ या विषयाचा पेपर व्हॉट्अपवर तासभरापूर्वी पाठविल्याप्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. जरुड येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात चमू पोहोचली आहे. यात वस्तुनिष्ठ चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
- जयंत वडते, संचालक, परीक्षा मंडळ, संत गाडगेबाबा विद्यापीठ