चिमुकल्यांना तंत्रज्ञानाचे धडे
By admin | Published: February 6, 2017 12:09 AM2017-02-06T00:09:50+5:302017-02-06T00:09:50+5:30
फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा...
सामाजिक उपक्रम : ढाकुलगावात ई-लर्निंग वर्गखोली
धामणगाव रेल्वे : फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग आजच्या संगणक युगात सामाजिक उपक्रमातून एचपीसीएलने राबवायला सुरूवात केली आहे. ढाकुलगावात चिमुकल्यांना ई-लर्निंग वर्गखोलीच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचे धडे मिळणार आहेत़
धामणगाव गॅस अॅण्ड डोमॅस्टिकच्यावतीने तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येते. तालुक्यातील चिमुकल्यांना बदलत्या शिक्षण प्रवाहात अधिक गती मिळण्याकरिता ढाकुलगाव हे गाव शैक्षणिक दृष्टिकोनातून दत्तक घेतले आहे़ हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि़ गॅस भराई संयंत्र खापरी नागपूर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने येथील जि़प़पूर्व माध्यमिक शाळेत ई-लर्निंग वर्ग खोली उभारली आहे़ चिमुकल्यांनी स्वच्छतेचा मंत्र अंगीकारावा म्हणून हँडवॉश केंद्र, मुलामुलींसाठी प्रसाधन गृहाची निर्मिती करण्यात आली आहे़
या उपक्रमाला हातभार लावणारे एचपीसीएलचे वरिष्ठ क्षत्रिय प्रबंधक महेश राम यांच्या हस्ते ई-लर्निंग खोलीचे लोकार्पण करण्यात आले़ यावेळी प़ंस़सभापती गणेश राजनकर, सयंत्र प्रबंधक विनोद साळुंके, उपप्रबंधक परिचालान अधिकारी प्रफुल्ल मानकर, अश्विन डोंगरे, लोकेश सक्सेना, धामणगाव गॅस अॅण्ड डोमॅस्टिकचे संचालक अशोक भंसाली, प़ंस़सदस्य सचिन पाटील, निखिल भंसाली, सरपंच विजय कांडलकर, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप माकोडे, केंद्रप्रमुख मुरलीधर नारे, विषयतज्ज्ञ शेषराव चव्हाण यांची उपस्थिती होती़
ग्रामीण विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळावे म्हणून एचपीसीएलने सामाजिक उपक्रमात एक पाऊल पुढे टाकल्याने येथील शाळा व्यवस्थापन समितीने आभार व्यक्त केले़ ई-लर्निग प्रक्रियेमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची बैद्धिक पातळी वाढायला मदत होईल, असे मत अशोक भंसाली यांनी व्यक्त केले़
संचालन मुख्याध्यापक अरविंद नाहे, तर प्रास्तावीक आश्विन डोंगरे व आभार प्रदर्शन भाष्कर पिंपळे यांनी केले़ कार्यक्रमाकरीता निखिल भंसाली, राजू वंजारी, सहायक शिक्षिका सारिका सुपले, बाली चुडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यांनी परिश्रम घेतले़ (तालुका प्रतिनिधी)