नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:57+5:302021-07-02T04:09:57+5:30

वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा ...

Tehsil smoke on the shoulders of Deputy Tehsildar | नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलची धुरा

नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलची धुरा

googlenewsNext

वरूड : तालुक्यात १४२ गावे, ६६ ग्रामपंचायती आणि दोन नगर परिषदांचा समावेश आहे. २ लाख १७ हजार ७५० पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. परंतु, तहसील कार्यालय तहसीलदारांअभावी सुने पडले आहे. प्रभारी म्हणून नायब तहसीलदारांची नियुक्ती आहे. परंतु कारकुनापासून तर तलाठ्यापर्यंत सर्वच तहसीलदारांच्या तोऱ्यात वावरत असतात. तथापि, अनेक शेतकऱ्यांच्या महसुली दस्तावेजांमध्ये चुकीच्या नोंदी घेतल्याने नागरिकांची कामे अडल्याची ओरड आहे. तहसील कार्यालय रामभरोसे झाले असल्याने सक्षम तहसीलदारांची नेमणूक करण्याची मागणी केली जात आहे.

वरूड तालुक्यात १०२ आबाद, तर ४० उजाड गावे आहेत. सात राजस्व मंडळ असून, सात मंडळ अधिकारी, ३५ तलाठी आणि ३९ कोतवाल महसुली कामकाज करतात. शेतकऱ्यांच्या सात-बारावर अनेक चुका असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मात्र, येरझारा मारून उंबरठे झिजविण्यापलीकडे काहीच मिळालेले नाही. तलाठी वेळेवर कार्यालयात हजार नसल्याने अभिलेखात दुरुस्त्या केल्या जात नाहीत, अशी नागरिकांची ओरड आहे. तालुक्यात रेती तस्करीला उधाण आले आहे. रेतीघाटाचे लिलाव प्रलंबित असून रेतीचोरांना रान मोकळे आहे. काही दलाल तहसील कार्यालयातच ठाण मांडून आपली कामे काढून घेतात.

वरुड तालुक्याच्या शेवटच्या गावाचे अंतर मुख्यालयापासून ३० ते ४० किमी आहे. येथून येणाऱ्या शेतकरी, विद्यार्थी किंवा सर्वसामान्य नागरिकांना महसुली दाखले, प्रमाणपत्र घ्यायचे असले, तर हेलपाटे मारावे लागते. अनेक कर्मचारी, अधिकारी गैरहजर असतात. प्रभारी तहसीलदारसुद्धा मुख्यालयी नसल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात. रेतीची ओव्हरलोड वाहने सर्रास सुरू आहे. शासकीय वाहन सोडून खासगी वाहन वापरून रस्त्यावरच मांडवली होत असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम तहसीलदारांची नेमणूक करून ‘खाबूगिरी’ला आळा घालावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: Tehsil smoke on the shoulders of Deputy Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.