अचलपूर तालुक्यात ‘तहसील आपल्या दारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:39+5:302021-06-24T04:10:39+5:30
तहसील कार्यालयात प्राप्त बऱ्याच अर्जांचा निपटारा करणे कोरोना कालावधीत शक्य झाले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे तहसील ...
तहसील कार्यालयात प्राप्त बऱ्याच अर्जांचा निपटारा करणे कोरोना कालावधीत शक्य झाले नाही. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे तहसील कार्यालयातील शेतकरी व इतर नागरिकांची प्रलंबित कामे निकाली काढण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, सध्या पेरणी व इतर शेतीविषयक कामे यामुळे शेतकऱ्यांना सुनावणीसाठी तहसीलपर्यंत येणे शक्य होत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी शैलेश नवाल व उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘तहसील आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम अचलपूर तालुक्यात राबविण्यात येत आहे. तालुक्यातील देवगाव व कविठा या दोन गावांपासून सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उपक्रमांतर्गत महसूलविषयक प्रकरणे विशेषतः रस्ता व नाली अडवल्याची प्रकरणे ही गावातच तात्काळ निकाली काढण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे प्रलंबित फेरफार, संजय गांधी योजना संदर्भातील कामकाज, पुरवठा विभागातील रेशन कार्ड व धान्य वितरणाबाबत कामकाज, नैसर्गिक आपत्ती विभागातील अनुदान वाटप, घरांची पडझड, शेतकरी आत्महत्या व इतर विषय, रोजगार हमी योजना, तलाठी व मंडळ अधिकारी स्तरावरील प्रलंबित कामकाज, महसूलविषयक विविध योजनांची माहिती, विविध दाखले तात्काळ तयार करून देणे व सेतुविषयक इतर कामकाज आदी बाबींचा या उपक्रमात समावेश आहे.
ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, शाळा यांसारख्या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जाणार असून त्याबाबतची माहिती गावात दवंडी देऊन दिली जाणार आहे. शेतकरी व इतर सर्व नागरिकांनी त्यांच्या कामाच्या अनुषंगाने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.