तहसीलदार, नायब तहसीलदारावर तहसीलची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:09 AM2021-06-28T04:09:58+5:302021-06-28T04:09:58+5:30

तहसीलचे कामकाज मंदावणार? १ जुलैपासून कामाचा खोळंबा: चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक ...

Tehsildar, Deputy Tehsildar on Tehsil Madar | तहसीलदार, नायब तहसीलदारावर तहसीलची मदार

तहसीलदार, नायब तहसीलदारावर तहसीलची मदार

Next

तहसीलचे कामकाज मंदावणार?

१ जुलैपासून कामाचा खोळंबा:

चांदूर बाजार : तालुक्यातील तहसील कार्यालयात १ जुलैपासून एक तहसीलदार व एक नायब तहसीलदारावर तहसीलचा संपूर्ण कारभार चालविण्याची वेळ येणार असल्याने तहसीलचे कामकाज मंदावणार असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.

जिल्ह्यात चांदूरबाजार तालुका हा सर्वात मोठा आहे. यात ६ जिल्हा परिषद सर्कल असून, १२ पंचायत समिती गण आहेत. तालुक्यात १७१ गावे असून, शिरजगाव बंड, करजगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी, ब्राह्मणवाडा थडी, आसेगाव आदी गावे मोठ्या लोकसंख्येची आहेत. स्थानिक तहसील कार्यालयात चार नायब तहसीलदारांचे पद मंजूर असून, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गजानन पाथरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या वेळी झालेल्या अपघातामुळे ते दीर्घ रजेवर आहेत.

निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार अर्जुन वांदे हे ३० मार्चला सेवानिवृत्त झाले, तर महसूल नायब तहसीलदार हे ३० जून रोजी निवृत्त होणार आहेत. निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाला होता. आता ३० जूनला नायब तहसीलदार देवेन्द्र सवई निवृत्त होणार असल्याने एका तहसीलदार व एका नायब तहसीलदारांच्या भरवशावर तहसीलचा कारभार चालणार का, असा प्रश्न सामान्य जनतेमधून विचारला जात आहे.

नुकतेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे रखडलेली कामे करण्यासाठी तहसीलमध्ये नागरिकांची अचानक गर्दी वाढली आहे. यात शेतकरी, विद्यार्थी, तसेच पक्षकारांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे तहसीलदारांना सहकारी असलेल्या नायब तहसीलदार असल्याशिवाय तहसीलचा कारभार पूर्णत: चालू शकत नाही. याकरिता नायब तहसीलदारांची रिक्त पदे तत्काळ भरणे आवश्यक झाले आहे.

( निवासी नायब तहसीलदार संतोष कारसकर यांचाही पूर्वी अपघात झाल्याने दुर्देवाने त्यांनाही अपंगत्व आले आहे. तरीसुद्धा त्यांची बदली अमरावतीहून चांदूर बाजारला गत वर्षी करण्यात आली. विशेष म्हणजे अपंग कर्मचाऱ्यांना १० किलोमीटरच्या आत त्यांचे मुख्यालय असावे, असा शासन निर्णय असल्याचे बोलले जाते. तरीसुद्धा त्यांना चांदूरबाजारला का पाठवण्यात आले? यावर तालुक्यातील कर्मचाऱ्यांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहे. दुसरीकडे काही कर्मचारी, अधिकारी अमरावतीमध्ये कित्येक वर्षांपासून ठाण मांडून बसले आहे. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना रिक्त जागांवर न पाठविता अपंग अधिकाऱ्यांना अन्य तालुक्यात पाठविण्यात आले. यावर चांगलीच चर्चा जोर धरत आहे.

Web Title: Tehsildar, Deputy Tehsildar on Tehsil Madar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.