धनेगावच्या शेतकरी आत्महत्येची तहसीलदारांमार्फत चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:38+5:302020-12-25T04:12:38+5:30
बच्चू कडू यांची सांत्वना भेट : स्वतंत्र चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश अंजनगाव सुर्जी : व्यापारी व पोलिसांकडून झालेल्या ...
बच्चू कडू यांची सांत्वना भेट : स्वतंत्र चौकशी समिती गठित करण्याचे निर्देश
अंजनगाव सुर्जी : व्यापारी व पोलिसांकडून झालेल्या मारहाणीने व्यथित झालेल्या शेतकऱ्याने केलेली आत्महत्या व त्यांच्या भावाच्या हृद्याघाताने झालेल्या मृत्यूची तहसीलदारांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. ना. कडू हे गुरुवारी धनेगाव येथे दाखल झाले. तेथे त्यांनी भुयार कुटुंबीयांची भेट घेतली.
संत्रा व्यापाऱ्यांकडून नाडविले गेलेले धनेगावच्या अशोक भुयार यांनी पोलिसांत धाव घेतली. मात्र, तेथे न्याय न मिळता मार पडल्याने हताश झालेल्या भुयार यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. तो धक्का सहन न झाल्याने त्यांच्या लहान भावाचा संजय भुयार यांचा हृद्याघाताने मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे एक चिठ्ठी लिहून अशोक भुयार यांनी आपल्यावरील आपबिती कथन केली. त्यापार्श्वभूमीवर ना. बच्चू कडू यांनी संपुर्ण प्रकरण जाणून घेतले. अंजनगाव तहसील गाठत तहसीलदार वैशाख वाहुरवाघ, प्रभारी ठाणेदार विलास कुलकर्णी, एपीआय विशाल पोळकर यांच्याशी चर्चा केली. पोलीस प्रशासनाच्या संशायस्पद भूमिकेच्या अनुषंगाने तहसीलदारांच्या अध्यक्षतेत स्वतंत्र चौकशी समिती गठित करण्यात येईल, असे ना. कडू म्हणाले. ठाणेदारासह संबंधित व्यापाऱ्यांविरूद्ध फसवणूकीचे गुन्हे दाखल व्हावेत, मारहाणीची सखोल चौकशी करून कार्यवाहीचे आदेश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले. मंत्र्यांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील पाहिले.
बॉक्स
ठाणेदार रजेवर
या संपूर्ण प्रकरणात अंजनगाव पोलिसांची नालस्ती झाली आहे. ठाणेदाराविरूद्धदेखील मारहाणीचा आरोप आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी महसूल व पोलीस यंत्रणेचा क्लासदेखील घेतला. असे असताना ठाणेदार राजेश राठोड हे आपल्या भाचीच्या लग्नासाठी आठवडाभराच्या रजेवर गेले आहेत. दरम्यान, अंजनगाव सुर्जीचे प्रभारी ठाणेदार म्हणून विलास कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारला आहे.
-----------------