सांगा, जगायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:29+5:30
पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोनामुळे सार्वत्रिक लग्न सोहळे, मुंजे व इतर आनंदाचे कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे बॅन्ड पथक आणि कलावंतांना गत तीन महिन्यांपासून रोजगार नाही. अतिशय हलाखीचे जगणे. सकाळी कामावर गेल्याशिवाय सायंकाळी चूल पेटत नाही, अशी विदारक स्थिती बँन्ड कलावंत असलेल्या मातंग बांधवांची आहे. त्यामुळे आता आम्ही जगायचे कसे, असा सवाल जिल्ह्यातील सुमारे पाच हजार बँन्ड कलावंतांनी उपस्थित केला आहे. गत दोन दिवसांपूर्वी अमरावती दौऱ्यावर आलेले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बँन्ड कलावंतांनी समस्यांचे निवेदन दिले.
पोट भरणे कठीण असताना मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न फारच कठीण झाला आहे. बँन्ड पथक अथवा कलावंतांसाठी उन्हाळ्यातील लग्नसोहळे हाच तीन ते चार महिन्यांचा हंगाम असतो. एरव्ही आठ महिने मोलमजुरी करून उपजिविका भागविणे हा त्यांचा पंरपरागत शिरस्ता आहे. बँन्ड कलावंतांकडे रिक्षा चालविणे, सुरक्षा रक्षक, कंत्राटी स्वच्छता, मोलमजुरी करणे हे पर्यायी रोजगाराचे साधन आहेत. मातंग समाजातील महिलादेखील कष्टकरी, श्रमजिवी म्हणून राबतानाचे चित्र आहे. गरिबी, हलाखीचे जगणे, श्रमातून मिळणाºया तुटपुंज्या रकमेवर उपजिविका हे बँन्ड कलावंत भागवितात. त्यामुळे बँन्ड कलावंतांच्या कुटंबीयातील नव्या पिढीने या पंरपरागत व्यवसायाकडे पाठ फिरवित शिक्षणाची कास धरल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुमारे ५०० बँन्ड पार्टी असून, प्रति २० ते ३० हजार रुपयांत करार करून बँन्ड पथक वाजवितात. कोरोनाचा मुला-बाळांच्या शिक्षणावर प्रभाव नक्कीच होणार आहे.
तीन बँड कलावंतांनी मृत्यूला कवटाळले
कोरोना महामारीच्या काळात बँन्ड कलावंतांना रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे उपासमारीने तीन बँड कलावंतांचा मृत्यू झाला. याबाबत पाच वेळा शासनाकडे निवेदन देण्यात आले. अद्यापही त्याची ना चौकशी, ना तपास करण्यात आला. शासनाच्या नोंदी मातंग समाजाचे बँड कलावंत हे कलावंत नाही, अशी भूमिका असल्याचा आरोप श्रीराम बँडचे संचालक महेंद्र सरकटे यांनी केला आहे. त्यामुळे मृत्युमूखी पडलेल्या तीन बँन्ड कलावंतांना न्याय मिळावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
बँन्ड कलावंत हा कोणत्याही संगीत विद्यालयात जात नाही. तो परंपरागत कलावंत आहे. तीन ते चार महिनेच बँन्ड क लावंतांना सुगीचे दिवस असतात. त्यामुळे शासनाने मानधन देऊन त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करावी.
-गणेशदास गायकवाड, संचालक