शतकानंतर उजळली मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा गावाची रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 10:20 AM2021-11-10T10:20:31+5:302021-11-10T10:36:23+5:30
टेंभुर्णी ढाणा येथील सौरऊर्जाआधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प ३७.८ किलोवॅटचा आहे. या प्रकल्पामुळे तेथील कुटुंबांना चोवीस तास वीज मिळू लागली आहे. गावात २० पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत.
अमरावती : शतकापासून अंधारात असलेल्या मेळघाटातील टेंभुर्णी ढाणा या गावात ‘मेडा’कडून सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, सौरऊर्जा प्रकल्पाचा लाभ मिळालेले हे मेळघाटातील तिसरे गाव आहे.
धारणी तालुक्यातील चोपण आणि चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेड्या येथे यापूर्वी सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून तिथे घरोघर वीज पोहोचविण्यात आली. या गावात विविध कारणांमुळे ‘महावितरण’ची वीज पोहोचणे शक्य नसल्याने मेळघाटातील दुर्गम खेड्यांपर्यंत वीज पोहोचणे हे मोठे आव्हान होते. या समस्येवर उपाययोजनेसाठी ‘महाऊर्जा’ने (मेडा) सौरऊर्जानिर्मितीसारख्या अपारंपरिक ऊर्जेचा पर्याय दिला. त्यानुसार चोपण व रेट्याखेड्यापाठोपाठ माखलानजीक टेंभुर्णी ढाणा या गावालाही सौरऊर्जाआधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्पाचा लाभ मिळाला आहे.
जिल्हाधिकारी पवनीत कौर व धरणी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांनीही याबाबत आढावा घेऊन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार महाउर्जातर्फे दिवाळीपूर्वी प्रकल्प पूर्ण करून कार्यान्वित झाला. तेथील रहिवाशांना ही दिवाळीची प्रकाशभेट मिळाल्याने खूप आनंद झाला आहे.
२० पथदिवे कार्यान्वित
टेंभुर्णी ढाणा येथील सौरऊर्जाआधारित सूक्ष्म पारेषण प्रकल्प ३७.८ किलोवॅटचा आहे. त्यासाठी ६९ लाख ९ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. या प्रकल्पामुळे तेथील कुटुंबांना चोवीस तास वीज मिळू लागली आहे. गावात २० पथदिवेही कार्यान्वित झाल्याने रस्तेही उजळले आहेत.
‘महाऊर्जा’कडून दुर्गम गावांत प्राधान्याने सौरऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार राजकुमार पटेल यांनी या गावासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार ‘महाऊर्जा’चे महासंचालक सुभाष डुंबरे, अतिरिक्त महासंचालक सूरज वाघमारे व प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे यांच्या मार्गदर्शनानुसार आराखडा तयार करण्यात आला, असे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी सांगितले.