यंदा तापमान उच्चांक गाठणार?
By admin | Published: June 8, 2014 11:32 PM2014-06-08T23:32:52+5:302014-06-08T23:32:52+5:30
नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
अमरावती : नवतपाने विदर्भात कहर केलाय. ४५ डिग्रीच्या आसपास पोहोचलेले तापमान यंदा ‘पन्नाशी’ गाठणार काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी नागपूरमध्ये ४७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थोड्याफार फरकाने विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत तापमानाने कहर केला आहे. अमरावती शहरातही तापमान ४६ अंशांच्या पलीकडे गेले आहे. तापमानाच्या ‘हाफ सेंच्युरी’च्या प्रश्नांची झळ फेसबुकलाही पोहचली असून या प्रश्नाला बर्याच लाईक मिळत आहेत.
पृथ्वीवरील तापमान ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढत असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. त्यामुळे अधिकअधिक वृक्ष लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, निसर्गाची देण असणारी झाडे विकासाचा मुद्दा पुढे करून सर्रास तोडली जात आहेत. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन ढासळत असल्याने तापमानही असंतुलित झाले आहे. या असंतुलित तापमानमुळे मानव जीवनसुध्दा प्रभावित होत असल्याचे दिसते.
गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या ऋतुमानाने मानवी जीवनावर मोठा प्रभाव केला आहे. ऊन, पाऊस व थंडीचा समतोलही ढासळला आहे. यंदाचा उन्हाळा सुरुवातीला फारसा जाणवला नाही. मात्र, एप्रिल व मे महिन्यात उन्हाच्या तडाख्याने सजीवांना घायाळ करून सोडले. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ४५ डिग्रीवर गेलेले तापमान दुसर्या आठवड्यात ४६.५ डिग्रीवर पोहोचले. नागपूरमध्ये तर तापमानाने उच्चांक गाठला असून ४७.३ पर्यंत पारा गेला आहे. यापेक्षा अधिक तापमान वाढल्यास नागरिकांना कोणत्या संकटाचा सामना करावा लागेल यांची कल्पना न केलेलीच बरी. या वाढत्या तापमानाची चर्चा दररोज सुरू असून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तापमानाच्या आलेखावर टीका-टिप्पणी होताना दिसत आहे.