आरोग्य व्यवस्थेला ‘अस्थायी’चा आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 10:55 PM2018-02-04T22:55:30+5:302018-02-04T23:00:53+5:30

जिल्ह्यात एकीकडे कुपोषण आणि बालमृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आरोग्य यंत्रणेत कायमस्वरुपी डॉक्टर व तंत्रज्ञाच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला नाही.

'Temporary' disease of health system | आरोग्य व्यवस्थेला ‘अस्थायी’चा आजार

आरोग्य व्यवस्थेला ‘अस्थायी’चा आजार

Next
ठळक मुद्देमुदतवाढीचा फार्स : वैद्यकीय अधीक्षकांसह सारेच टेम्पररी

आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यात एकीकडे कुपोषण आणि बालमृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढत असताना आरोग्य यंत्रणेत कायमस्वरुपी डॉक्टर व तंत्रज्ञाच्या भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाला नाही. जिल्ह्यातील झाडून सर्वच मोठ्या सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा ‘अस्थायी’ स्वरूपाची असल्याने त्याचे विपरीत पडसाद जनआरोग्यावर उमटले आहे.
अनेक वर्षांपासून जिल्हा आरोग्य यंत्रणेला अस्थायी पदाचा आजार जडला असून, त्यावर तीन-तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा सोईस्कर उपचार सुरू आहे. आलटून-पालटून तीच माणसे आरोग्य यंत्रणेत असून त्यांनाच मुदतवाढ मिळत असल्याने ‘पर्मनंट’ भरती प्रक्रिया होणार तरी केव्हा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २० जानेवारी रोजी शासन निर्णय काढून या अस्थायी पदांना पुन्हा २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील ९४, जिल्हा स्त्री रुग्णालयातील २६, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अर्थात सुपर स्पेशालिटीतील ३१९, उपजिल्हा रूग्णालय अचलपूर येथील १, ग्रामीण रुग्णालय भातकुली येथील १५ व ट्रामाकेअर युनिट बडनेरा येथील १३ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत ना-हरकत दिली आहे. काही वर्षांपासून हा मुदतवाढीचा सेफ गेम सार्वजनिक आरोग्य विभागात सुरू असून, त्यावर कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही. क्लास वन ते क्लास फोर मधील या पदांवर काम करणाºया अधिकारी-कर्मचाºयांच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याने हे ‘अस्थायी’ पदधारक ‘आरोग्य यंत्रणा’ कितपत निष्ठेने चालवत असतील, हा संशोधनाचा विषय आहे.

या पदांना मुदतवाढ
वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, क्ष-किरण तंत्रज्ञ, बाह्य रुग्णसेवक, परिसेविका, लिपिक टंकलेखक, रक्तपेढी तंत्रज्ञ, कक्षसेवक, शिपाई, अपघात विभाग सेवक इत्यादींना मुदतवाढ मिळाली.

Web Title: 'Temporary' disease of health system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.