दहा मिनिटांत आटोपले साडेसात कोटींचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 11:29 PM2019-01-21T23:29:01+5:302019-01-21T23:29:16+5:30
जिल्हानिधी लेखाशीर्ष २५१५-१०१ लोकपयोगी व योजनांतर्गत ७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांची यादी सोमवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दहा मिनिटांत बहुमताने मंजूर करून सभा आटोपती घेण्यात आली. ही सभा १२ वाजता सुरू झाली व २१.१० वाजता अध्यक्षांनी सभागृह सोडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हानिधी लेखाशीर्ष २५१५-१०१ लोकपयोगी व योजनांतर्गत ७ कोटी ५१ लाख ५० हजार रुपयांच्या कामांची यादी सोमवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत दहा मिनिटांत बहुमताने मंजूर करून सभा आटोपती घेण्यात आली. ही सभा १२ वाजता सुरू झाली व २१.१० वाजता अध्यक्षांनी सभागृह सोडले.
जिल्हा परिषदेच्या सेसफंडातून सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात सत्ताधारी पक्षाने २५१५-१०१ या लेखाशिर्षांतर्गत लहान लोकपयोगी कामांचे सुमारे ७ कोटी ३० लाख २० हजार रुपयांचे नियोजन केले आहे. सदर नियोजनात सदस्यांना समन्यायी निधी वाटप झाले नसल्याची तक्रारी झेडपीतील विरोधी पक्षाने विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार २६ डिसेंबर रोजी आयुक्तांनी सदर नियोजन सीईओ, कॅफो आणि डेप्युटी सीईओंच्या स्वाक्षरीने सभेत मान्यतेसाठी ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अध्यक्षांनी सोमवारी सभा आयोजित केली होती.
जिल्हा निधी लेखाशीर्षक २५-१५ लोकपयोगी लहान कामे व योजना मधील सन २०१८-१९ चे नियोजनानुसार विविध विभागांकडून जिल्हा परिषद प्रशासनाकडे १३ कोटी ६६ लाख ७५ हजार रुपयांच्या कामांची यादी प्राप्त झाली होती. त्यानुसार ५०१ च्या दीडपट कामांचे नियोजन म्हणजेच ७ कोटी ५१ ला रूपयांप्रमाणे जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाने नियोजन केले होते. त्यानुसार सदर विषय ६ आॅक्टोबर व ११ नोव्हेंबरच्या सभेत ठेवला होता. मात्र, लोकोपयोगी लहान कामे यातील नियोजनाची यादी सभागृहात ठेवण्यात आली नाही. याशिवाय सदर यादीवर सीईओ व कॅफोंच्या स्वाक्षºया नव्हत्या आणि समन्यायिक निधीचे वाटप ५९ सदस्यांमध्ये करण्यात आले नाही. अशी तक्रार जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षांच्या सदस्या सुहासिनी ढेपे, रवींद्र मुंदे व अन्य सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी कामांची यादी समन्यायी वाटपासह सीईओ, कॅफो यांच्या स्वाक्षरीने सभेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, विरोधी सदस्य बाळासाहेब हिंगणीकर, पूजा हाडोळे, प्रियंका दगडकर, सुरेश निमकर, शरद मोहोड, अनिता मेश्राम, वासंती मंगरोळे, वंदना करूले, अलका देशमुख प्रभारी सीईओ विनय ठमके, डेप्युटी सीईओ नारायण सानप, कॅफो रवींद्र येवले, डेप्युटी सीईओ प्रशांत थोरात, माया वानखडे, दिलीप मानकर, कार्यकारी अभियंता प्रशांत गावंडे खाते प्रमुख उपस्थित होते.
लोकोपयोगी लहान कामांच्या नियोजनास बहुमताने मंजुरी दिली आहे. यात ५९ सदस्यांना समान न्याय देऊन सर्वांची प्राधान्यक्रमाने कामे आहेत. त्यात कुठलाही अन्याय झाला नाही. त्यामुळे विरोधकांच्या आक्षेपात काही तथ्य नाही.
- नितीन गोंडाणे,
अध्यक्ष, जिल्हा परिषद
सत्ताधारी पक्षाने लोकोपयोगी कामे साडेसात कोटींच्या मर्यादेत १ ते २४५ क्रमांकापर्यंत करावी. त्यापुढील कामे केल्यास विभागीय आयुक्तांकडे दाद मागू. सदर यादीत विरोधी पक्षाच्या सदस्यांना निधीच दिला नाही, हा अन्याय आहे.
- रवींद्र मुंदे,
विरोधी पक्षनेता जि.प.