जसापूरच्या सरपंचांनी मागितली दहा लाखांची खंडणी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:13 AM2021-03-25T04:13:51+5:302021-03-25T04:13:51+5:30
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील जसापूर ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगातून झालेल्या कामात अनियमिततेचा आरोप करीत, सरपंच मंगेश थोरात ...
टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील जसापूर ग्रामपंचायत अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगातून झालेल्या कामात अनियमिततेचा आरोप करीत, सरपंच मंगेश थोरात यांनी दहा लाख रुपयांची खंडणीची मागितल्याची तक्रार विस्तार अधिकारी व तत्कालीन प्रशासक प्रल्हाद तेलंग यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबत दोघांच्या संवादाची ऑडिओ क्लिप त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.
भातकुली तालुक्यातील जसापूर येथे विविध विकासकामे व साहित्य खरेदीकरिता चौदाव्या वित्त आयोगातून दहा लाख रुपये खर्च करण्यात आले होते. त्यावेळी प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी तेलंग हे तेथे कार्यरत होते. त्यामुळे ग्रामसेवकाच्या माध्यमातून सदर निधी खर्च करण्यात आला तसेच खर्चाबाबत संपूर्ण अहवाल प्रल्हाद तेलंग यांच्याकडे सादर करण्यात आला. तेलंग यांनी याबाबतची सर्व पडताळणी करीत स्वाक्षरी केली होती. त्यामुळे या निधीमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचे तेलंग यांनी सांगितले आहे. असे असताना जसापूर येथे दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नवनिर्वाचित सरपंच मंगेश थोरात यांनी केला आहे.
दरम्यान, विस्तार अधिकारी तेलंग यांच्या तक्रारीनुसार, मंगेश थोरात यांनी वारंवार संपर्क साधला व भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार पंचायत समितीत ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजता भेटण्याकरिता बोलावले. चौदाव्या वित्त आयोगातून झालेल्या कामांबाबत असमाधान व्यक्त करीत त्यांनी यात मोठा घोळ झाल्याचा आरोप केला आणि तेलंग यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचे सांगितले. सदर प्रकरण मिटविण्यासाठी मला दहा लाख रुपये द्या, अशी मागणीदेखील यावेळी मंगेश थोरात यांनी केली. परंतु, तेलंग यांनी याबाबत स्पष्ट नकार दिला तसेच याबाबत चौकशी लावण्यासंदर्भातदेखील सांगितले.
पत्रकार परिषदेत आरोप
मंगेश थोरात यांनी तेलंग यांच्याविरोधात विविध ठिकाणी तक्रारी केल्या तसेच याच विषयात पत्रकार परिषदसुद्धा घेतली होती.
सीईओंकडे तक्रार
मंगेश थोरात यांनी दहा लाख रुपये मागितल्याची व्हिडीओ क्लिप विस्तार अधिकारी तेलंग यांनी काढली. सदर पुराव्यांनीशी विस्ताराधिकारी प्रल्हाद तेलंग यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल येडगे यांच्याकडे तक्रार दिली. या प्रकरणात केवळ खंडणीकरिता गोवले जात असून, संबंधित सरपंचाविरुद्ध कारवाई व्हावी, अशी मागणी तेलंग यांनी केली आहे.
बॉक्स
जसापूर येथे झालेल्या कामाची व साहित्य खरेदीची पोचपावती मला मिळाली आहे. सरपंच थोरात यांनी दहा लाखांची मागणी करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पत्रकार परिषदेदरम्यान माझ्या विरोधात गंभीर आरोप लावले. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे.
- प्रल्हाद तेलंग, विस्तार अधिकारी, भातकुली पंचायत समिती
------------
अद्याप कुठलीही तक्रार माझ्यापर्यंत आलेली नाही. ती आल्यास पंचायत विभागाला योग्य कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात येतील.
- अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
------------
विस्तार अधिकारी व ग्रामसचिवांनी घोळ केल्याच्या आरोपावर मी ठाम आहे. माझी बाजू पत्रपरिषदेत स्पष्ट केली होती. खंडणीचे आरोप खोटे आहेत.
- मंगेश थोरात, सरपंच, जसापूर