दहा जणांचे नोंदविले बयाण
By admin | Published: November 8, 2016 12:06 AM2016-11-08T00:06:53+5:302016-11-08T00:06:53+5:30
बनावट दस्तऐवज सादर करून मतदारयादीत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचा नुकताच भंडाफोड झाला.
बनावट मतदार नोंदणी प्रकरण : तहसील कार्यालयामार्फत कारवाई
अमरावती : बनावट दस्तऐवज सादर करून मतदारयादीत नोंदणी करण्याचा प्रयत्न केल्याचा नुकताच भंडाफोड झाला. यासंदर्भात तहसीलदार कार्यालयामार्फत २४० अल्पवयीन विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यापैकी सोमवारी दहा जण हजर झाल्याने त्यांचे बयाण नोंदविण्यात आले असून उर्वरितांचे बयाण मंगळवारी नोंदविले जाणार आहे. हाचौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष ठेवल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०१७ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणारे या मतदारनोंदणीसाठी पात्र आहेत. मात्र, २४० मतदारनोंदणी अर्जाला बनावट दस्तऐवज जोडून अल्पवयीनांना मतदारयादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न तहसील प्रशासनाने हाणून पाडला. या बनावट अर्जात बोनाफाईड प्रमाणपत्र, वयाचे दाखले देखील बोगस असल्याचे नायब तहसीलदारांनी केलेल्या पडताळणीत आढळून आले. त्यासर्व अर्जांवर स्थानिक पठाण चौक येथील असोसिएशन उर्दू ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य फिरोज खान यांच्या स्वाक्षरी दिसून आल्यात. ते २४० बनावट अर्ज रद्द करण्यात आले असून चौकशीअंती योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या २४० जणांना तहसील कार्यालयाद्वारे नोटीस बजावण्यात आली होती.
त्यापैकी सोमवारी केवळ दहा जण उपस्थित राहिले. त्यांचे बयाण नोंदविण्यात आले असून मंगळवारी उर्वरीत ४० जणांचे बयाण नोंदविले जाईल. त्यानंतर चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांसमक्ष ठेवला जाईल. पश्चात पुढील कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती तहसीलदार सुरेश बगळे यांनी दिली.