पोलीस ठाणी दहा; आरोपींचा भार केवळ शहर कोतवालीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:22+5:302021-08-24T04:17:22+5:30
अमरावती : शहरात दहा पोलीस ठाणी असली तरी, आरोपींना ठेवण्याची व्यवस्था केवळ शहर कोतवाली ठाण्यात आहे. तेथील लॉकअपमध्ये दहाही ...
अमरावती : शहरात दहा पोलीस ठाणी असली तरी, आरोपींना ठेवण्याची व्यवस्था केवळ शहर कोतवाली ठाण्यात आहे. तेथील लॉकअपमध्ये दहाही पोलीस ठाण्यातील पीसीआरचे व अन्य आरोपी ठेवण्यात येत आहेत. राजापेठ ठाण्यातील ‘डेथ ईन कस्टडी’ने कोठडीची उपलब्धता व सुरक्षाव्यवस्था ऐरणीवर आली आहे. त्यामुळे आयुक्तालय स्तरावर पर्यायी कोठडीवर विचारमंथन केले जात आहे. पोलीस आयुक्तालयात मध्यवर्ती कोठडी असावी, असा पर्यायदेखील विचाराधीन आहे.
गाडगेनगर वगळता नऊ पोलीस ठाण्याच्या इमारतीत ‘लॉकअप’ आहे. त्या लॉकअपचे बांधकाम, अन्य बाबी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदोष असल्याने तेथील आरोपी शहर कोतवाली व राजापेठ ठाण्यातील लॉकअपमध्ये पाठविण्यात येत होते. सागर ठाकरेच्या आत्महत्येमुळे राजापेठचे लॉकअप तूर्तास बंद आहे. त्यामुळे कोठडीबाबत पोलिसांची अवस्था ‘आधीच फाल्गून मास, त्यात उल्हास’ अशी झाली आहे. त्यामुळे शहर कोतवाली ठाण्यातील कोठडी आरोपींसाठी वापरली जात आहे.
गाडगेनगर वगळता अन्य ठाण्याला स्वतंत्र व नवनिर्मित इमारती आहेत. सन २०१३ मध्ये खोलापुरी गेट व फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला नव्या इमारती मिळाल्या. या दोन्ही पोलीस ठाण्यात कोठडीदेखील बनविण्यात आली. मात्र, कोठडीचे बांधकाम जुन्या प्लॅननुसार केल्याने ती कोठडी वापरली जात नाही.
सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर
राजापेठ ठाण्यातील कोठडीच्या अँगलला गळफास घेऊन सागर ठाकरेने आत्महत्या केली. त्यामुळे तेथील उपस्थित पोलिसांच्या हजेरीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. कोेठडी व त्यातील आरोपींची हालचाल टिपण्यासाठी त्यात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, त्यातही डेथ ईन कस्टडीचे प्रकार घडत असतिल, तर दुसऱ्या पोलीस ठाण्याचे ओझे आम्ही का वाहावेत, अशी प्रतिक्रिया पोलीस दलात उमटली आहे.
शहर कोतवालीच्या कोठडीने टाकली कात
राजापेठच्या लॉकअपला पुढील निर्णयापर्यंत ‘लॉक’ लागल्याने कोतवालीतील लॉकअपच्या सुरक्षेचा नव्याने धांडोळा घेण्यात आला. तेथे सुरक्षेच्या अनुषंगाने जाळी बसविण्यात आली. अन्य डागडुजीदेखील करण्यात आली.
कोट
राजापेठ ठाण्यातील लॉकअप तूर्तास बंद आहे. त्यामुळे शहर कोतवालीत लॉकअपवरील भार वाढला आहे. नांदगाव पेठ ठाण्यातील लॉकअप सुसज्ज असले, ते अंतर अधिक असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फ्रेजरपुरा व अन्य ठाण्यातील कोठडी वापरता येईल का, याबाबत विनिमय सुरू आहे.
डॉ. आरती सिंह,
पोलीस आयुक्त