शेतक-यांना सवलतीत दरमहा दहा हजार टन धान्य; आत्महत्या रोखण्यासाठी उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2017 03:45 PM2017-10-14T15:45:09+5:302017-10-14T15:45:17+5:30
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला.
अमरावती - दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना मदतीचा हात म्हणून शासनाने अल्प किमतीत अन्न-धान्य देण्याचा निर्णय घेतला. यात मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येत आहे. अमरावती विभागातील शेतकरी सुमारे १० हजार मेट्रिक टन अन्न-धान्याची उचल दरमहा करीत आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर गरजू शेतकऱ्यांना तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो दराने गहू वितरित करण्यात येत आहे. सवलतीच्या दरात स्वस्त धान्य दुकानांमार्फत दिले जात आहे. गेल्या काही वर्षांत अनियमित आणि कमी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नापिकीमुळे शेतक-यांची अवस्था बिकट झाली आहे. विभागात सर्वाधिक सहा लाख तीन हजार ३३२ लाभार्थी अमरावती जिल्ह्यात आहेत. याच जिल्ह्यातील शेतक-यांकडून ३ हजार १७ मेट्रीक टन धान्याची उचल होते. त्याखालोखाल बुलडाणा जिल्ह्यात चार लाख ३१ हजार १२१ लाभार्थी असून दोन हजार १५५ मे. टन धान्याची येथील शेतकरी उचल करतात. यवतमाळ जिल्ह्यात चार लाख पाच हजार २१५ शेतक-यांकडून दोन हजार २६ मे. टन धान्याची उचल होते. अकोला जिल्ह्यात दोन लाख ५२ हजार ९३० शेतकरी एक हजार २६५ मे.टन तर वाशिम जिल्ह्यात दोन लाख ४६ हजार ९५७ शेतकरी एक हजार २३५ मे. टन धान्याची उचल करीत आहे.
विभागात १९ लाख शेतकरी लाभार्थी
अमरावती विभागात पाचही जिल्ह्यांतील शेतक-यांची संख्या १९ लाख ३९ हजार ५५५ आहे. या शेतकऱ्यांद्वारा सहा हजार २५० मेट्रीक टन गहू, तर तीन हजार ४४८ मेट्रीक टन तांदूळ असा एकूण नऊ हजार ६९८ मेट्रीक टन धान्याची उचल प्रत्येक महिन्याला करीत आहेत. शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यातील शेतकºयांना या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.