रेतीची अवैध वाहतूक करणारे दहा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:57 PM2018-01-09T23:57:05+5:302018-01-09T23:57:53+5:30
वर्धा नदीतून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे दहा ट्रक महसूल विभागाने जप्त केले आहेत.
आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : वर्धा नदीतून क्षमतेपेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणारे दहा ट्रक महसूल विभागाने जप्त केले आहेत. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी ३ लाख १७ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सोमवारी रात्री तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी अवैध रेती वाहतूकदारांवर करावाईचा बडगा उगारला. त्यांनी तळेगाव दशासर, अंजनसिंगी चौफुली, कुऱ्हा मार्ग, मंगरूळ दस्तगी, देवगाव परिसरात कारवाई करीत तब्बत दहा ट्रक जप्त केले. या ट्रकमधून क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक केली जात होती. कारवाई करण्यासाठी तालुक्यात पाच भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. तहसीलदारांनी स्वत: या पथकांसोबत रात्री गस्त घातली. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यानी सांगितले. यापूर्वीदेखील त्यांनी तालुक्यातील अवैध रेती वाहतूकदारांवर कठोर कारवाई केली होती. एक महिन्यापूर्वी कारवाई करून त्यांनी रेती माफियावर अंकुश लावला होता. आता पुन्हा या मोठ्या कारवाईमुळे रेती वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहे.
पाच घाटांवर करडी नजर
तालुक्यातील गोकुळसरा, आष्टा, नायगाव, चिंचोली, वकनाथ, विटाळा या रेतीघाटांवर महसूल विभागाने करडी नजर ठेवली आहे. लिलाव झाल्यानंतर अधिकृत परवानगी मिळण्यापूर्वी रेतीचे उत्खनन करण्यात आले आहे. तलाठ्यांनी घाटाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना थेट निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याची माहिती तहसीलदार डोईफोडे यांनी दिली.