भाजप-युवा स्वाभिमान यांच्यात दहा वर्षांपासून छुपी मैत्री, रवी राणांनी सांगितली 'मन की बात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2022 01:26 PM2022-08-23T13:26:23+5:302022-08-23T13:34:58+5:30
आमदार, खासदार दाम्पत्य ‘वायएसपी’वर निवडणूक लढणार, रवी राणा यांची स्पष्टोक्ती
अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभा मतदार संघात निवडणूक ‘कमळ’वर असेल, असे वक्तव्य रविवारी केल्याने जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, भाजप आणि युवा स्वाभिमान यांच्यात गत दहा वर्षांपासून राजकीय मैत्री असून, ती यापुढे कायम राहील, अशी स्पष्टोक्ती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘ते’ वक्तव्य वैयक्तिक तर नाही?, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार रवी राणा यांच्यातील मैत्री सर्वदूर परिचित आहे. या दोघांमधील संबंध राजकारणांपलीकडे आहे, असे अनेक उदाहरण यापूर्वी घडले आहे. म्हणूनच २०१९ विधानसभा निवडणुकीत बडनेरा मतदार संघातून भाजप-सेनेच्या युतीच्या उमेदवार प्रीती बंड या होत्या. तेव्हा बडनेरा मतदार संघातून अपक्ष उमेदवार रवी राणा हे रिंगणात होते. मात्र, ना. देवेंद्र फडणवीस हे बडनेरा मतदार संघात विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आले नव्हते. केवळ रवी राणा यांच्यासोबतची मैत्री त्यांनी जोपासली होती, हे विशेष.
बडनेरा मतदार संघातून सलग तीन वेळा रवी राणा हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्यासोबत असते, तर शिवसेनेचा उमेदवार अमरावती मतदार संघातून निवडून आला नसता, असे जाहीरपणे खासदार नवनीत राणा यांंनी रविवारी आयोजित दहीहंडी कार्यक्रमात ना. फडणवीस यांच्या समक्ष केले. मात्र, २०१९ मध्ये ना. फडणवीस यांचा मला छुपा पाठिंबा होता आणि मी विजयी झाले, असे खासदार राणा म्हणाल्या.
जिल्हा परिषद, महापालिकेत असेल भाजपची सत्ता
अमरावती जिल्हा परिषद आणि महापालिकेत भाजप व युवा स्वाभिमान यांच्यात राजकीय मैत्री होणार असून, या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या ताब्यात असतील, असा दावा आमदार रवी राणा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपची सत्ता असावी, यासाठी तसे वक्तव्य केले आहे. अमरावती लोकसभा निवडणूक आणि बडनेरा विधानसभा ही युवा स्वाभिमानच्या बॅनरखाली लढविली जाणार असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राणा दाम्पत्य यांच्यात असलेली राजकीय मैत्री किती घट्ट आहे, हे आता सर्वश्रूत झाले आहे.
अपक्ष खासदार म्हणून देशात मी एकमात्र आहे. मतदारांचा विश्वास, विकासकामे आणि स्वकर्तृत्वाने अमरावती लोकसभा मतदारसंघाची बांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोेदी, गृहमंत्री अमित शहा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे भाजपच्या पाठिंब्याने युवा स्वाभिमानवरच लोकसभा निवडणूक लढविणार.
- नवनीत राणा, खासदार, अमरावती.
२०२४ मध्ये जिल्ह्यातून सहा आमदार असणार
- येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे पाच तर युवा स्वाभिमान पार्टीचा एक असे एकूण सहा आमदार विजयी होतील, तशी तयारी सुरू झाली आहे. अमरावती लोकसभा निवडणूकसुद्धा ‘वायएसपी’ बॅनरखाली लढविली जाणार आहे.
- अमरावती जिल्ह्यात भाजप आणि वायएसपी यांच्यात राजकीय मैत्री जवळपास निश्चित असल्याबाबतचे सुतोवाच आमदार रवी राणा यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या राजकीय मैत्रीला होकार असेल, ही बाब आमदार राणा यांनी स्पष्ट केली.