निविदा ‘मॅनेज’ कंत्राट निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:13 PM2018-02-05T22:13:24+5:302018-02-05T22:13:43+5:30
शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शहराला पाणीपुरवठा करणाºया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ अंतर्गत ८३ कोटींच्या विविध विकासकामांसाठी अगोदर एजन्सी निश्चित केली, तर त्यानंतर कंत्राट सोपविले, असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणली असून, मजीप्राच्या अधिकाऱ्यांचे पितळ त्याअनुषंगाने उघडकीस आले आहे, हे विशेष.
मुख्य जलवाहिनीवर तांत्रिक दोष असलेले ८७ बोगस एअर व्हॉल्व्ह ८३ लाख रुपयांतून बसविण्यात आले आहेत. त्यानंतर मजीप्राच्या अफलातून कारभार समोर आला आहे. ‘अमृत’ अभियान अंतर्गत पाणीपुरवठा टप्पा-२ मध्ये तब्बल ११४ कोटी रुपयांतून पाणीपुरवठा वितरण नलिकांचे कार्य नवीन जलकुंभ निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ८३ कोटींच्या कामांचा निर्णय घेण्यात आला. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यासाठी अगोदरच नाशिक येथील मयूर व्हॉल्व्ह कंपनी निश्चित करण्यात आली. त्याकरिता मजीप्राने ३० आॅगस्ट २०१६ रोजी व्ही.ई.१६/१७ पीओ-०८ आदेशानुसार जलवाहिनीवर बसविलेल्या व्हॉल्व्हची तांत्रिक तपासणी केली, असा अहवाल डॉ. अमीन कंट्रोलर्स प्रा.लि. कंपनीने दिला आहे. मात्र, मजीप्राने १० आॅक्टोबर २०१६ रोजी पाणीपुरवठा कामांसंदर्भात नाशिक येथील मयूर कंपनीला एअर व्हॉल्व्ह बसविण्याबाबत कार्यारंभ आदेश दिले.
खरे तर मजीप्राने ८३ लाख रुपयांतून जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. असे असताना नाशिक येथील पी.ए. आडके व वैद्य इलेक्ट्रिकल यांना दोन महिन्यांपूर्वीच मजीप्राला एअर व्हॉल्व्ह लागेल, हे कसे माहीत पडले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. एअर व्हॉल्व्हसंदर्भात त्रयस्थ एजन्सीकडून तपासणी करण्यात आली असता, ही बाब निदर्शनास आली आहे. क्वॉलिटी कंट्रोलची तपासणी ३० आॅगस्ट २०१६, तर पाणीपुरवठा कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले आहे. त्यामुळे मजीप्राने अगोदर एजन्सी ठरविली, नंतर कामांचे आदेश दिले, हे स्पष्ट होते.
व्हॉल्व्हची ही स्थिती; अन्य कामांचे काय?
मजीप्राने जुनी जलवाहिनी बदलून त्याऐवजी ६०० किमी नवी जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहे. नव्याने सहा जलकुंभ, सिंभोरा येथे नवे पंप स्टेशन, तपोवन येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र आदी पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे सुरू आहेत. मात्र, जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्ह बसविण्यात झालेली गडबड बघता, अन्य कामांमध्येही मोठा घोळ असल्याचा संशय वर्तविला जात आहे.
व्हॉल्व्हचे क्वॉलिटी कंट्रोल ३० आॅगस्ट रोजी झाले, तर कामांचे कार्यारंभ आदेश १० आॅक्टोबर २०१६ रोजी देण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच एजन्सी ठरविण्याचा करिश्मा मजीप्राने केला आहे. नाशिक येथील एजन्सीला मजीप्राला अमूक साहित्य लागणार असल्याचे दोन महिन्यांपूर्वीच कळले.
- सुनील देशमुख
आमदार.