महापौर कला महोत्सवाची निविदा उघडलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:56+5:30
महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात सामान्य कर्मचारी नाहक भरडले जातात, याची कित्येक उदाहरणे आहेत. महापौर कला महोत्सवातदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या महोत्सवावर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. ६ व ७ तारखेला झालेल्या या महोत्सवात आलेल्या कलावंतांचे मानधन, प्रवास खर्च तसेच निवास व भोजन खर्च १९ लाख वगळता, इतर कामांच्या ११ लाखांच्या कामाची निविदा उद्घाटनाच्या दिवशी काढण्यात आली व निविदा उघडण्याचा दिनांक हा १२ जानेवारी होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागच्या आठवड्यात झालेल्या महापौर कला महोत्सवाची निविदा या आठवड्यात काढण्याचा प्रकार महापालिका प्रशासन व शिक्षण विभागाच्या अंगलट आलेला आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने जनदरबारात मांडल्यानंतर ही निविदा दोन दिवसांपासून उघडण्यात आलेली नाही. महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या दबावात कायद्याला कशी बगल दिली जाते, याचीच चर्चा रंगली आहे.
महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावात सामान्य कर्मचारी नाहक भरडले जातात, याची कित्येक उदाहरणे आहेत. महापौर कला महोत्सवातदेखील याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली. या महोत्सवावर ३५ लाखांचा खर्च करण्यात आला. ६ व ७ तारखेला झालेल्या या महोत्सवात आलेल्या कलावंतांचे मानधन, प्रवास खर्च तसेच निवास व भोजन खर्च १९ लाख वगळता, इतर कामांच्या ११ लाखांच्या कामाची निविदा उद्घाटनाच्या दिवशी काढण्यात आली व निविदा उघडण्याचा दिनांक हा १२ जानेवारी होता. कार्यक्रम झाल्यावर आठवडाभराने निविदा काढण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला. याची खमंग चर्चा महानगरात रंगली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते, अन्य पक्षनेते यांनी ही याबाबत प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या प्रकारात महापालिका प्रशासन तोंडघशी पडले. त्यामुळे बुधवारी व शुक्रवारी सायंकाळपर्यंत ही निविदा उघडण्यात आलेली नव्हती. किंबहुना उपायुक्त सुरेश पाटील यांनी ही निविदा रद्द करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे महापौर कला महोत्सवाचे काम निविदेपूर्वी करणाºया कंत्राटदारांना बाजारभावाने किंवा निविदा उघडून एल-१ च्या दराने पेमेंट देण्यात येणार असल्याची माहिती आहे. यासंदर्भात आयुक्तांशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.
बांधकाम विभागाचा संबंध कुठे ?
महापौर कला महोत्सावत १९ लाखांचा खर्च महापालिकेच्या तरतुदीमधून करण्यात आल्यानंतर इतर कामांची ११ लाखांची निविदा ही शिक्षणाधिकाºयांनी काढली. यामध्ये बांधकाम विभागाचा दुरान्वयेही संबंध नसताना, या विभागाच्या तांत्रिक चुकीमुळे निविदेला विलंब झाल्याचा कांगावा करण्यात आला. यासंदर्भात शहर अभियंत्यांशी संपर्क केला असता, त्यांनी ही बाब फेटाळली. कला महोत्सवाच्या निविदेशी बांधकाम विभागाचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.