बेलोरा विमानतळाच्या डिझाईन, प्लॅनिंगची अखेर निविदा जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 09:53 PM2018-06-27T21:53:59+5:302018-06-27T21:54:18+5:30
बहुप्रतीक्षित बेलोरा विमानतळाच्या विकासाची दारे खुलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई- निविदा काढली असून, महिनाभरात एजन्सी नेमली जाईल, अशी माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बहुप्रतीक्षित बेलोरा विमानतळाच्या विकासाची दारे खुलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विमानतळाची संरचना (डिझाईन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात ई- निविदा काढली असून, महिनाभरात एजन्सी नेमली जाईल, अशी माहिती आहे.
बेलोरा विमानतळ विकासासाठी शासनाने ७५ कोटी रूपये मंजूर केले. त्यानुसार १५ कोटींचा पहिला टप्पा वितरीत केला आहे.
जानेवारीमध्ये विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण झाले. त्यानंतर वस्तुनिष्ठ अहवाल केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाकडे पाठविला. ओएलएस सर्वेक्षणानंतर डिझाईन, प्लॅनिंगसाठी यापूर्वी ई-निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, दोनच एजन्सींनी निविदेत सहभाग घेतला होता. त्यामुळे आता पुन्हा नव्याने ई-निविदा काढल्या आहे. राष्ट्रीय स्तरावरील एजन्सींनी ई-निविदेत सहभागी व्हावे, यासाठी एका बड्या इंग्रजी वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित झाली आहे. शिर्डीच्या धर्तीवर बेलोरा विमानतळ विकासाची वाटचाल सुरू झाली आहे. मुंबईच्या एका एजन्सीने विमानतळाचे डिझाईन, प्लॅनिंगसाठी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ई-निविदेअंती विमानतळाचे विकासाचे शिलेदार कोण होणार, हे महिन्याभरात स्पष्ट होईल.
डिझाईन, प्लॅनिंगमध्ये या बाबींचा समावेश
बेलोरा विमानतळ धावपट्टीची लांबी १८५० मीटर केली जाईल. टर्मिनल इमारत, अग्निशमन केंद्र, एटीसी टॉवर निर्मिती, अप्रन क्षमतेत वाढ, तीन एटीआर व एक एअर बस बोर्इंग, विद्युत वाहिन्यांची पुनर्बांधणी, रस्ते चौपदरीकरण, पाणीपुरवठा व्यवस्था, वाहनतळ, सुरक्षा यंत्रणा, इमारत बांधकामाचे स्वरूप आदी विकासकामांचा समावेश असणार आहे.
‘उड्ड्राण’मधून अमरावतीला निधी का नाही?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी ‘उड्डाण’ योजनेंतर्गत देशातील ७२ शहरांमध्ये विमानतळ निर्मितीची घोषणा केली होती. मात्र, राजकीय अनास्थेमुळे जमीन अधिग्रहीत असुनही बेलोरा विमानतळाचा विकास पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे पुढाऱ्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून विमानतळाच्या विकासासाठी ‘उड्डाण’ योजनेतून निधी खेचून आणावा, अशी अपेक्षा आहे.
बेलोरा विमानतळाच्या डिझाईन, प्लॅनिंगची निविदा निघाल्याने रखडलेले विकासकामे सुकर होतील. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. त्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत.
- प्रवीण पोटे, पालकमंत्री