‘महसूल’च्या जागेसाठी महापालिकेकडून निविदा!

By admin | Published: June 18, 2017 12:01 AM2017-06-18T00:01:19+5:302017-06-18T00:01:19+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जागेसाठी महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला.

Tender for the revenue of the municipal corporation! | ‘महसूल’च्या जागेसाठी महापालिकेकडून निविदा!

‘महसूल’च्या जागेसाठी महापालिकेकडून निविदा!

Next

फूड प्लाझा : करारनामा अंतिम टप्प्यात, एनओसीची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील जागेसाठी महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. ही निविदा प्रक्रिया फूडझोनसाठी राबविण्यात आली. याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून महापालिकेला ना हरकत मिळालेली नाही. प्रशांतनगर उद्यानासमोरील जागेसंदर्भात हा पेचप्रसंग उद्भवला आहे.
प्रशांतनगरस्थित महापालिकेच्या उद्यानासमोरील मोकळ्या जागेवर हातगाड्या लावून फूडप्लाझा साकारण्यासाठी गतवर्षी महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबवून राजकुमार राठोड यांना देण्यात आला. त्यांचा कंत्राट मे अखेरीस संपुष्टात आल्याने फूड प्लाझाच्या देखरेखीसाठी २० मे रोजी नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली. १० हजार रूपये बयाणा रक्कम असलेल्या या कंत्राटाचा कालावधी १ वर्षे असल्याचे जाहिरातीस नमूद करण्यात आले. त्यासाठी २.९९ लाख रुपयांचे आॅफरमूल्य ठरविण्यात आले. अर्थात एकाच वेळी ही रक्कम महापालिकेत भरून संबंधित कंत्राटदार वर्षभरासाठी फूड प्लाझा चालवायला घेणे शक्य होते. उद्यानासमोरील या मोकळ्या जागेवर २५ हातगाड्यांसाठी ही निविदा प्रक्रिया करण्यात आली. ३० मे रोजी निविदा उघडण्यात आल्या. त्यात २.९९ लाख रूपये आॅफरमुल्य असताना पल्लवी उमाकांत अहेरराव यांनी ६.५० लाख रूपये देण्याची तयारी दर्शविली. यासाठी एकूण ७ निविदाधारक आलेत. यात सर्वाधिक रक्कम अहेरराव यांची असल्याने पुढील वर्षभरासाठी अहेरराव या फूड प्लाझाची देखरेख करतील. फूड प्लाझाचा कंत्राट घेणाऱ्या अहेरराव यांना या उद्यानासमोर २५ स्टॉल २५०० रुपये प्रतिमहिना घेऊन लावता येईल. ही जागा जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित असतानाही निविदा जाहिरातीमध्ये ‘महापालिकेच्या जागेवरील फूड प्लाझाच्या देखभालीकरिता’ असे नमूद केले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला. मात्र अद्याप उत्तर मिळाले नसल्याची माहिती आहे.

इ-निविदा प्रक्रियेला फाटा
फूड प्लाझाच्या देखरेखीसाठी २.९९ लाख रूपये आॅफरमूल्य ठरविण्यात आले. तेच आॅफरमूल्य ३ लाख किंवा ३ लाखांपेक्षा अधिक ठेवले असते तर ई-निविदा प्रक्रिया अवलंबिणे गरजेचे होते. मात्र २.९९ लाख रुपये आॅफरमुल्य ठेवून ई-निविदा प्रक्रियेला फाटा देण्यात आला.

उद्यानासमोरील जागेसंदर्भात जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. तथापि, महापालिकेला त्याबाबत उत्तर प्राप्त झालेले नाही.
- नरेंद्र वानखडे,
उपायुक्त, महापालिका

Web Title: Tender for the revenue of the municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.