चिमुकल्याच्या मृत्यूनंतर इर्विनमध्ये तणाव
By admin | Published: September 3, 2015 12:04 AM2015-09-03T00:04:19+5:302015-09-03T00:04:19+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यासाठी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरल्याने ...
शवविच्छेदन रोखले : डॉक्टरांवर बेजबाबदारपणाचा आरोप
अमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गुन्हे नोंदविण्यासाठी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. शेवटी पोलीस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर सायंकाळी ५.३० वाजता चिमुकल्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
विस्तृत माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चौरेनगर परिसरातील सूरज ऊर्फ गोलू गवई नामक अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याला ताप येत असल्याने जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, योग्य वेळी उपचार न मिळाल्याने मंगळवारी रात्री ९.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर संतापलेल्या सूरज गवईच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला
कारवाई करण्याचे सीएसचे आश्वासन
अमरावती : सूरजच्या मृत्यूसाठी इर्विनमधील डॉक्टरांना जबाबदार ठरविले. जोवर दोषी डॉक्टरांवर कारवाई होणार नाही तोवर सूरजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू न देण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यांनी तब्बल २० तास शवविच्छेदन रोखून धरले. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक व पोलिसांनी मध्यस्थी करून आरोपी डॉक्टर व स्टाफ नर्सवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिजनांचा संताप कमी झाला आणि त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
सूरजच्या कुटुंबीयांच्या मते त्याला थोडासा ताप आला होता. मंगळवारी दुपारी १ वाजता त्याला इर्विन रूग्णालयात दाखल करण्यात आले. तो वॉर्ड क्र. ५ मध्ये दाखल होता. यानंतर सायंकाळी ७ वाजता त्याच्या प्रकृतीत सुधारणादेखील झाली होती. मात्र, थोड्या वेळातच त्याचे हातपाय आखडू लागले.
याबाबत संबंधित नर्सला कुटुंबीयांनी सूचना दिली व डॉक्टरांना बोलविण्याची विनंती केली. त्यावेळी डॉक्टर नागलकर यांची ड्युटी होती. मात्र, नर्सने डॉक्टरांना बोलविण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर कॉल ड्युटी डॉक्टर दिवाण यांना दूरध्वनी केला असता ते १०.३० वाजता वॉर्ड क्र. ५ मध्ये पोहोचले. मुलाचे परीक्षण करून त्यांनी त्याला मृत घोषित केले. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच सूरजचा मृत्यू झाला, असे त्याच्या परिजनांचे म्हणणे आहे. सूरजच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी इर्विनमध्ये गोंधळ घातल. त्यामुळे उशिरापर्यंत येथे पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता.