‘जुन्या पेन्शन’ने वाढले जिल्हा प्रशासनाचे टेन्शन; कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 05:36 PM2023-03-15T17:36:16+5:302023-03-15T17:37:17+5:30
कार्यालये ओस, दुसऱ्या दिवशीही धरणे
गजानन मोहोड
अमरावती : शासकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर गेल्याने शासनाचे कामकाज प्रभावित झाले आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. या संपामुळे आरोग्य सेवा काही प्रमाणात विस्कळीत झालेली आहे. कर्मचारी रस्त्यावर असल्याने कार्यालये ओस पडली आहेत व कामानिमित्त आलेल्या सर्वसामान्य नागरिकाला परतावे लागल्याचे दिसून आले.
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत धरणे दिले. सध्या कंत्राटी दहावी व बारावीच्या परीक्षेत कुठलाही अडथळा येऊ नये, यावर प्रशासनाचा वॉच आहे. दरम्यान,
शासकीय कामकाजासाठी जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा परिषदेसह अन्य विभागात आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला, जिल्हाधिकाऱ्यांद्वारा नियमित बैठका मात्र सुरू आहेत. मंगळवारी रेल्वे व विमानतळ संदर्भात व बुधवारी कृषी विभागाचा आढावा जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी घेतला.
संपात ११ हजार कर्मचाऱ्याचा सहभाग
जिल्ह्यातील २१ विभागांचे १०,०१८ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. याशिवाय अन्य चार ते पाच विभागांचे मिळून किमान ११ हजार कर्मचारी संपात आहे. याव्यतिरिक्त ३१ टक्के कर्मचारी व अधिकारी कर्तव्यावर उपस्थित आहे. याशिवाय तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल संपात सहभागी नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी सांगितले.