राजापेठ चौकात तणाव
By admin | Published: October 14, 2014 11:12 PM2014-10-14T23:12:23+5:302014-10-14T23:12:23+5:30
स्थानिक राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना आणि युवा राष्ट्रवादी समर्थित उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये असून या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोमवारी रात्री आमने- सामने आलेत.
पोलीस आयुक्त पोहोचले : उमेदवारांची प्रचार कार्यालये केली बंद
अमरावती : स्थानिक राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, शिवसेना आणि युवा राष्ट्रवादी समर्थित उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये असून या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते सोमवारी रात्री आमने- सामने आलेत. त्यामुळे काही काळ तणावदेखील निर्माण झाला. दरम्यान पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आयुक्तांनी मुख्य प्रचार कार्यालये बंद पाडलीत. एवढेच नव्हे तर प्रचार कार्यालयांवरील उमेदवारांचे पोस्टर, होर्डिंग्ज, प्रचार साहित्य काढण्यास भाग पाडले.
सोमवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. त्यानंतर कार्यकर्ते, समर्थक उमेदवारांच्या प्रचार कार्यालयात एकत्रित झाले. कार्यकर्ते आणि समर्थकांची गर्दी वाढली. राजापेठ चौकात बडनेरा मतदारसंघातील काँग्रेस, युवा स्वाभिमान व भाजप, शिवसेना उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच गर्दी केली होती. काही कार्यकर्ते रस्त्यावरच चर्चा करीत उभे होते. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गर्दी केल्याने वाहतुकीत खोळंबा निर्माण होऊ लागला होता. राजापेठ चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्याच्या बाजूने उभे राहण्याचा सल्ला दिला. मात्र येथे गर्दी वाढतच होती. काँग्रेस आणि युवा स्वाभिमानच्या उमेदवारांचे मुख्य प्रचार कार्यालये समोरासमोर असल्यामुळे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. काही वेळाने तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही बाब पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांना कळताच त्यांनी घटनास्थळी क्यूआरटी पथकासह दाखल झाले. सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचारतोफा थंडावल्या तरी राजापेठ चौकातील उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयावरील पोस्टर, बॅनर, होर्डिग्ज हटविण्यात आले नव्हते. परिणामी आयुक्त मेकला यांनी काँग्रेस, युवा स्वाभिमान, भाजप उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयावरील मतदारांना आकर्षित करणारे साहित्य काढण्याच्या सूचना उमेदवारांच्या समर्थकांना केल्यात. यावेळी काही कार्यकर्त्यांनी होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर हटविण्यास नकार दिला.
मात्र, पोलीस खाक्यापुढे कार्यकर्त्यांना नमते घ्यावे लागले. अखेर प्रचार कार्यालयावरील होर्डिंग्ज, पोस्टर, बॅनर काढण्यात आले. प्रचार कार्यालये बंद करुन कार्यकर्त्यांना निघून जाण्याच्या सूचना करण्यात आल्यात. राजापेठ चौकातील प्रचार कार्यालयात सुरु असलेली खानावळी, गर्दी शमविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलीस आयुक्तांचा ताफा बडनेरा मार्गावरील शिवसेनेच्या प्रचार कार्यालयात पोहचला. या कार्यालयात असलेली गर्दी हटविण्याचे पोलिसांनी सांगितले. त्वरित खानावळी बंद करण्यात आले. प्रचार कार्यालयावरील साहित्य हटविले गेले. काही कार्यकर्ते झिंगलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे या कार्यकर्त्यांना प्रचार कार्यालयाच्या आत पाठविण्यासाठी म्होरक्यांना कसरत करावी लागली. अखेर प्रचार कार्यालयावरील बॅनर, पोस्टर हटविण्यासाठी सहकार्य केले. पुढे पोलीस आयुक्तांचा ताफा गाडगेनगर येथील शिवसेनेचे उमेदवार प्रदीप बाजड यांच्या मुख्य प्रचार कार्यालयासमोर पोहचला.
यावेळी प्रदीप बाजड, लक्ष्मी वर्मा यांचा पोलिसांशी वाददेखील झाल्याची माहिती आहे. कायदा, सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले. (प्रतिनिधी)