रुग्णाच्या मृत्यूवरून ग्रामीण रुग्णालयात तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:23 AM2019-05-30T01:23:55+5:302019-05-30T01:24:30+5:30
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णाच्या नातेवाइकांच्या कानाखाली डॉक्टरांनी लावली व संबंधित रुग्णाला अमरावती येथे रेफर केले. तो रस्त्यातच दगावला. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. ही गर्दी पांगविण्यासाठी तब्बल चार तास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल रुग्णाच्या नातेवाइकांच्या कानाखाली डॉक्टरांनी लावली व संबंधित रुग्णाला अमरावती येथे रेफर केले. तो रस्त्यातच दगावला. येथील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी तेथे गर्दी केली. ही गर्दी पांगविण्यासाठी तब्बल चार तास पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
तालुक्यातील ढाकूलगाव येथील नरेंद्र दिवाकर बाभूळकर (४१) याला उष्माघातामुळे ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याच्या नातेवाइकाने आरोग्य सेविकेला त्रास दिल्याचे गाºहाणे पुढे येताच तेथे कार्यरत डॉ. आशिष सालनकर यांनी नातेवाइकाच्या कानाखाली लगावली. यादरम्यान रुगणाची प्रकृती गंभीर झाल्याने रात्री १ वाजता अमरावतीला हलवावे लागले. मात्र, रस्त्यातच नरेंद्रचा मृत्यू झाला. यादरम्यान डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकास मारहाण केल्याचे वृत्त गावात पोहोचताच ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली.
याप्रकरणी डॉ. आशिष सालनकर यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. दत्तापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मंगरूळ दस्तगिर, तळेगाव दशासर, कुºहा पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण केले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांना पहाटे पाचारण करण्यात आले. तब्बल चार तास ग्रामीण रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे यांनी घटनास्थळी भेट दिली.
याप्रकरणी परस्परविरोधी कोणीही पोलिसांत तक्रार दिली नव्हती. त्यामुळे १२ वाजता लावलेला पोलीस बंदोबस्त हटविण्यात आला. मृत नरेंद्र बाभूळकर याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बुधवारी करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास ढाकुलगाव येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेंद्र बाभूळकर याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे.
नरेंद्र बाभूळकर यांच्यावर उपचार सुरू असताना नातेवाइकाने दारूच्या नशेत आरोग्य सेविकेला त्रास दिला. उपचारादरम्यान नातेवाइकांनी डॉक्टरांना त्रास देणे, शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे?
- डॉ. आशिष सालनकर
ग्रामीण रुग्णालय
डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाइकांना मारणे योग्य नाही. डॉ. आशिष सालनकरमुळे नरेंद्रचा जीव गेला. सीसीटीव्ही तपासल्यास दोषी कोण, हे लक्षात येईल. येथे राजकारण करणाऱ्या सालनकरची त्वरित बदली करण्यात यावी.
- विजय कांडलकर
सरपंच, ढाकुलगाव