अमरावती शहरामध्ये तणावपूर्ण शांतता, आमदारासह भाजपचे दोघे ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 06:23 AM2021-11-15T06:23:24+5:302021-11-15T06:23:59+5:30
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला.
अमरावती : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपतर्फे पुकारलेल्या ‘बंद’ला हिंसक वळण लागले. त्यानंतर शहरात शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली असून रविवारी दिवसभर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता होती. अमरावतीमधील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारचा बंद पुकारणारे भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांना रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले; तर, भाजपच्या जिल्हाध्यक्षा निवेदिता दिघडे यांनादेखील आशियाना क्लबमध्ये स्थानबद्ध करण्यात आले.
त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या मुद्द्यावरून शनिवारी रात्री दोन समुदाय आमनेसामने आले होते. तुफान दगडफेक करण्यात आली. वाहने पेटविण्याचा प्रयत्नही झाला. त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर, रबरी बुलेटचा वापर केला. शनिवारी पहाटे तीन वाजल्यानंतर परिसर शांत झाला. दोन दिवसांतील अनुचित घटनांसाठी जबाबदार व्यक्तींवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ५० संशयितांना अटक करण्यात आली. तपास जारी असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.
पोलीस अधीक्षक परतवाड्यात
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ शनिवारी रात्री अचलपूर-परतवाड्यात दाखल झाले. तेथे रविवारी भाजपने बंदची हाक दिली होती. पोलिसांनी जुळी शहरे पायी पिंजून काढत शांततेचे आवाहन केले. त्यामुळे तेथे हिंसाचाराचे गालबोट लागले नाही. वरूड शहरात बंद पुकारणाऱ्या सातजणांना अटक करण्यात आली.
पालकमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन
nपालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अतिसंवेदनशील भागाची पाहणी करून शांततेचे आवाहन केले.
nजिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी जे शक्य असेल, ते करण्याचे आदेश त्यांनी दिले. खासदार नवनीत राणा यांनीही काही भागांची पाहणी केली.