अफगाणिस्तानात तणाव वाढला; अमरावतीत ड्रायफ्रुटस महागले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:17 AM2021-08-20T04:17:26+5:302021-08-20T04:17:26+5:30
अमरावती : अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवताच आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. याचे पडसाद अफगाणिस्तानातून आयात ...
अमरावती : अफगाणिस्तानवर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळवताच आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. याचे पडसाद अफगाणिस्तानातून आयात होणाऱ्या ड्रायफ्रुटसवर झाले असून, पाच दिवसातच भावात तेजी आली आहे. अमरावतीच्या बाजारपेठेत ड्रायफ्रुटस ३० ते ४० टक्क्यांनी महागल्याचे चित्र आहे.
अफगाणिस्तानातून जर्दाळू, कंधारी किसमिस, अंजीर, मामरा बदाम, शहाजिरा देशात मागविला जातो. ड्रायफ्रुटसह मसाले पदार्थ निर्यात करणारा देश, अशी अफगाणिस्तानची ओळख आहे. मात्र, तालिबानी दहशतवाद्यांनी एकूणच अफगाणिस्तानवर कब्जा मिळवून सत्ता उलथवून टाकली आहे. तेथील नागरिक जीव मुठीत घेऊन अफगाणिस्तान सोडून अन्य देशात पलायन करण्याचा मार्ग शोधत आहे. या सर्व घडामोडींचा अफगाणिस्तानातील उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: ड्रायफ्रुटस महागले आहे. थोक व्यापारी चिंतेत असून, १५ दिवसांचा स्टॉक पुरेल, एवढाच माल गोदामात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ड्रायफ्रुट्सच्या किमती गगणाला भिडतील, असे संकेत आहेत.
---------------------------
हे पाहा भाव (प्रतिकिलो)
तणावापूर्वीचे भाव सध्याचे भाव
- कंधारी किसमिस ३५० ४००
- जर्दाळू ३५० ४५०
- अंजीर ९१० ११००
- मामरा बदाम २१०० २३००
- शहाजिरा ४०० ४५०
--------------------------------
१५ दिवसांपुरताच स्टॉक
जर्दाळू, कंधारी किसमिस, अंजीर, मामरा बदाम, शहाजिरा, काजू आदी ड्रायफ्रुट्स असलेला माल १५ दिवस पुरेल एवढाच गोदामात शिल्लक आहे. अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीचा जागतिक व्यवसायावर मोठा परिमाण होणार आहे. ड्रायफ्रुट्स साहित्य हे अफगाणिस्तानातून भारतात मागविले जाते. मात्र, तेथे भीषण स्थिती निर्माण झाली असल्याने याचे पडसाद अनेक वर्षे व्यवसायावर होईल, असे स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अमरावती शहरात ड्रायफ्रुट्स थोक १५ आणि किरकोळचे १०० दुकाने आहेत.
------------------
दर पूर्ववत होणे कठीण
नक्कीच अफगाणिस्तानात तणाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार पूर्ववत होण्यासाठी अनेक दिवस लागतील. तूर्त याबाबत भाष्य करणे शक्य नाही. मात्र, १५ दिवसांनी ड्रायफ्रुट्सचे भाव वधारल्याशिवाय राहणार नाही.
- हाजी हारुण सुपारीवाला, व्यापारी
---------------
ड्रायफ्रुट्स व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अफगाणिस्तानात निर्माण झालेली ही स्थिती कधी रूळावर येईल, हे सद्यस्थितीत सांगता येणे नाही. परंतु, याचे ड्रायफ्रुट्स व्यवसायावर गंभीर परिणाम होतील. कोट्यवधीची उलाढाल थांबली.
- चेतन सिरवानी, व्यापारी